Private Advt

संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापकांच्या आर्थिक उलाढालींकडे ‘आयकर’,‘ईडी’ देणार का लक्ष?

खान्देशातील ‘40 लाखांच्या एरंडोली’नंतर उच्चशिक्षण क्षेत्रातून सूर

अमित महाबळ / जळगाव – देशभरातील राजकीय पुढारी, उद्योगपती आणि अभिनेते आदींचे आर्थिक गैरव्यवहार हुडकून काढणार्‍या ‘ईडी’, ‘आयकर’ आणि ‘सीबीआय’ या केंद्रीय यंत्रणांनी आता खान्देशातही उच्च शिक्षण क्षेत्रातील काही संस्थाचालक, प्राचार्य आणि प्राध्यापकांची झाडाझडती घेतली पाहिजे, असा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

‘जनशक्ती’ने गेल्याच आठवड्यात ‘गप्पा-टप्पा’ या सदरांत ‘40 लाखांची एरंडोली’ हा किस्सा प्रसिद्ध केला होता. त्याआधारे उच्च शिक्षण क्षेत्रातील कशी एरंडोली सुरू आहे, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी भरतीमध्ये कशा प्रकारचे गोंधळ, आर्थिक व्यवहार होतात याचे एकाहून एक सरस किस्से काहींनी ‘जनशक्ती’कडे कथन केले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये जर तथ्य असल्याचे गृहित धरले तर ईडी (Enforcement Directorate) (ED) , आयकर (IT), सीबीआय (CBI) या केंद्रीय तपास यंत्रणांनी खान्देशातील काही शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य व प्राध्यापक यांच्यावर लक्ष केंद्रित करायला हवेे. त्यातून अनेक आर्थिक गैरव्यवहार आणि लपवले गेलेले उत्पन्न अर्थातच ‘काळा पैसा’ (black money) उघडकीस येऊ शकतो.

शिक्षण क्षेत्रातील पैसा हा अन्य व्यवहारात कशा प्रकारे फिरवला जातो याचाही माग काढणे आवश्यक आहे. शेती, व्यापार, राजकारण, जिनिंग प्रेसिंग, बांधकाम व्यवसाय, विविध संस्था चालविणे, पेट्रोल पंप, पतसंस्था आदी व्यवसायात उच्च शिक्षण क्षेत्रातील लहान-मोठी नावे गुंतलेली आहेत. त्यात काहीजण असेही असू शकतात की, जे या व्यवसायाच्या माध्यमातून आपली ‘काळी’ कमाई चलनात आणणारे महाभागदेखील असतील. मात्र, हे हुडकून काढण्यासाठी खोदकाम झाले तरच सत्य समोर येऊ शकते.

 

  •  पैसा कुठे वळता झाला हे शोधण्याचे आहेत वेगवेगळे मार्ग
    उच्चशिक्षण संस्थांमधील भरतीमध्ये गैरमार्गाने झालेली आर्थिक देवाण-घेवाण शोधून काढायची असल्यास गेल्या 10 ते 15 वर्षात प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीदरम्यान नियुक्त झालेला उमेदवार, त्याच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्ती वा नातेवाईक, सासरकडील मंडळी आदींपैकी कोणाच्या नावावर आर्थिक उलाढाली झाल्या, कर्ज घेतले गेले आणि नंतर हा पैसा कुठे वळता केला गेला याची माहिती घेतली गेली पाहिजे. वैयक्तिक कर्ज काढणे, तसेच सोने, शेत, जमीन, प्लॉट, घर विक्री हाही एक भरतीसाठी पैसा देण्याचा मार्ग बनला आहे का ? याचे उत्तर शोधले गेले पाहिजे, असाही सूर उच्च शिक्षण क्षेत्रात आहे.

 

  • संस्थाचालकांच्या पतसंस्थेतील ठेवी गेल्या कोठे ?
    काही संस्थाचालक, प्राध्यापक, तसेच शिक्षण क्षेत्रातून निवृत्त झालेल्या व्यक्ती यापैकी काहींच्या खान्देशात विविध ठिकाणी पतसंस्था आहेत. या ठिकाणी ठेव ठेवणार्‍या व्यक्ती, त्यापैकी किती जण संबंधित पतसंस्थाचालकाच्या किंवा त्याच्या नातेवाईकाशी संबंधित संस्थेत नंतर नोकरीला लागले आणि त्यानंतर त्या ठेवीदाराने आपली ठेव मोडून तो पैसा कोठे वळता केला याचीही माहिती घेतल्यास भन्नाट किस्से समोर येऊ शकतात, असाही दावा शिक्षण क्षेत्रातून केला जात आहे.

 

  • काळ्या पैशाच्या क्षेत्रात काही प्राध्यापक ?
    बांधकाम व्यवसाय म्हणजे काळ्या पैशाचे मोठे उगमस्थान मानला जातो. या व्यवसायातही काही प्राध्यापक असल्याची चर्चा आहे. त्यांचे व्यवहार, प्रकल्पाच्या किंमती आणि प्रकल्प उभारणीवर झालेला खर्च जर तपासला गेला तर मोठे घबाड तपास यंत्रणांना मिळेल, असाही सूर आहे.