संशोधकांनी तयार केला प्लास्टिक खाणारा किडा

0

लंडन । सध्या प्लास्टिकमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे अवघे जगं त्रस्त आहे. प्लास्टिक हे नष्ट करता येत नसल्याने प्लास्टिकच्या कचर्‍याची मोठी समस्या जगातील सर्वच देशासमोर आहे. मात्र, यावर आता संशोधकांनी एक उपाय काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी चक्क प्लास्टिक खाणारा किडाच तयार केला आहे. जो प्लास्टिकच्या कचर्‍यात सोडल्यास ते प्लास्टिक खाण्यास सुरुवात करतो.

तसे पाहिले तर आपल्याकडे प्लास्टिकच्या कपातून किंवा ग्लासातून खाणे हे आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हटले जाते. मात्र, ब्रिटनमध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी अलीकडेच प्लास्टिक खाणार्‍या किड्याचा शोध लावला आहे. हा किडा प्लास्टिक कुरतडून खातो. त्यामुळे या किड्याला प्लास्टिकवर्म अशा नावाने संबोधले जाते. या किड्याचे आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर हा किडा चक्क मधमाशांचे पोळेही पचवतो.

जगभरात एकूण आठ कोटी टन प्लास्टिक तयार केले जाते. या प्लास्टिकचा वापर फूड बॅग किंवा शॉपिंग बॅग बनवण्यासाठी केला जातो. परंतु, हे प्लास्टिक विघटनासाठी अनेक वर्षही कमी पडतात, म्हणूनच यावर पर्याय म्हणून केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या किड्यांचा शोध लावला आहे. गॅलेरिया मेलोनेला असे या किड्याचे नाव असून हा किडा प्लास्टिक बॅगेला काही वेळातच छिद्र पाडून प्लास्टिक खाण्यास सुरुवात करतो. त्याचप्रकारे प्लास्टिक विघटनासाठी हा किडा कशाप्रकारे प्रक्रिया करतो? यावर संशोधन करून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे कसे विघटन करता येईल? याचा विचार केला जात आहे.