संशयीत दुचाकीस्वारांना अडवताना पोलिसांवर गोळीबार : अप्रिय घटना टळली

पाल भागातील सहस्त्रलिंगजवळील घटना : संशयीत दरोडा वा शिकारीच्या उद्देशाने आल्याचा संशय ः पोलिसांच्या पाठलागानंतर संशयीतांचे पलायन

 

 

रावेर : रावेर-पाल आदिवासी भागात सहस्त्रलिंगनजिक एका टपरीवर मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास पाल पोलिस चहा पीत असताना दोन दुचाकी भरधाव वेगाने येत असताना संशय आल्याने पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र एक दुचाकीस्वार सुसाट पळाला तर दुसर्‍या दुचाकीस्वाराने काही अंतरावर गेल्यानंतर यु टर्न घेत पोलिसांच्या दिशेने गावठी बंदुकीतून गोळीबार केला तर पळण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लीप होवून बंदुक जमिनीवर पडली. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी झडप घातला मात्र तो पर्यंत ते पसार झाले. मध्यरात्री संशयीत शिकार वा दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आल्याचा संशय आहे. संशयीत मध्यप्रदेशातील असल्याचा दाट संशय असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

गोळीबाराने उडाली खळबळ
रात्रीची पेट्रोलिंग केल्यानंतर रावेर पोलिसांची कॅमेरा व्हॅन (एम.एच.19 एम.0681) ने रावेरच्या दिशेने येत असतांना रावेरकडून पालकडे जाणार्‍या एका रस्त्यावर मध्यरात्री साडेतीन वाजता गस्ती पथक चहा घेण्यासाठी थांबले असताना दोन दुचाकींवरून चार संशयीत भरधाव वेगाने येत असल्याने पोलिस कर्मचारी श्रीराम कांगणे आणि गृहरक्षक दलाचे सुनील तडवी, कांतीलाल तायडे आणि अमित समर्थ यांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वारांना थांबण्याचा इशारा केला मात्र एक दुचाकी सुसाट निघाली तर दुसर्‍या दुचाकीस्वाराने काही अंतर गेल्यानंतर पुन्हा यु टर्न घेतला व पोलिसांच्या दिशेने ठाचणीच्या बंदुकीतून (दारू गोळा भरण्याची) एक गोळी झाडली मात्र अंतर जास्त असल्याने अप्रिय घटना घडली. याचवेळी आरोपींना पकडण्यासाठी पोलिस धावले मात्र दुचाकीस्वार पळण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याची दुचाकी घसरली व त्याचवेळी बंदुकी खाली पडल्याने दोघे दुचाकीस्वार अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चार जणांविरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार मनोहर जाधव करीत आहे.

अपर पोलिस अधीक्षकांची भेट
घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधीक्षक नरेंद्र पिंगळे, प्रभारी पोलिस निरीक्षक बशीर शेख, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वानपथक आणि तसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, सुदैवाने ठाचणीची बंदुक असल्याने अप्रिय घटना टळली तर काडतुस असलेली बंदुक असतीतर तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. संशयीत मध्यप्रदेशातील असल्याची दाट शक्यता असून त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

शिकार असल्याचा संशय : अपर पोलिस अधीक्षक
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी म्हणाले, संशयीत शिकारी असावेत. घटनास्थळी आढळलेली बंदुकी शिकारीसाठी वापरली जाते. पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आला असून मध्यप्रदेशात पोलिसांचे पथक पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले.