संधीसाधू राजकारण्यांना कर्नाटकात चपराक; फडणवीसांचा सेनेला टोला !

0

मुंबई: कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. १५ पैकी १२ जागांवर भाजपला विजय मिळाला. या विजयाने कर्नाटक सरकारवरील सत्ता जाण्याचे संकट टळले आहे. सत्ता कायम टिकविण्यासाठी भाजपला ६ जागांची आवश्यकता होती. दरम्यान कर्नाटकातील विजयावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांचे अभिनंदन करत संधीसाधू राजकारणींना कर्नाटकातील जनतेने धडा शिकविल्याचे सांगितले आहे. फडणवीस यांनी ट्वीट करून कर्नाटक सरकारचे अभिनंदन केले आहे. यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेला देखील टोला लगावला आहे. जनादेशाचा अपमान करणारे आणि संधीसाधू लोकांना जनता अशा प्रकारे धडा शिकविते असे सांगत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून कर्नाटकात भाजपला जनादेश दिला होता. मात्र कॉंग्रेस आणि जेडीएसने एकत्र येत सरकार स्थापन केले. मात्र ६ महिन्यातच कॉंग्रेस, जेडीएसचे काही आमदार भाजपच्या गळाला लागले. त्यांनी भाजपला पाठींबा दिल्याने भाजपचे सरकार आले. मात्र बंडखोर आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्या जागेवर पोटनिवडणुक झाली होती. यात भाजपलाच यश मिळाले. यावरून फडणवीस यांनी पुन्हा शिवसेनेला कर्नाटकच्या राजकारणाची आठवण करून देत भाजप पुन्हा सत्तेत येईल याचे संकेत दिले आहे.

Copy