संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागातर्फे राष्ट्रीय वेबिनार

0

मुक्ताईनगर: येथील संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे आयोजित एक दिवसीय ‘स्त्रीवादी साहित्य: बदलते आयाम’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनार झाला. टाळेबंदीच्या काळात घरून ऑनलाईन पद्धतीने साहित्यविषयक चर्चा व्हावी या हेतूने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले. 6 जून रोजी या वेबिनारचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विद्याभारती शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब शेखावत होते. त्यांनी ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री पुरुष तुलना’ या स्त्रीमुक्तीवरील आद्य ग्रंथांपासून तर आजच्या स्त्रीवादी साहित्याचे अनेक ऐतिहासिक व कौटुंबिक दाखले देऊन अभ्यासपूर्ण असे विवेचन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.डी.पाटील यांनी वेबिनार आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली.

प्रास्ताविक डाॅ.वंदना लव्हाळे यांनी केले.
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.संजय शेखावत, विद्याभारती संस्थेचे सचिव डाॅ.अशोक चव्हाण, कृषी विज्ञान केंद्राच्या (दुर्गापूर) सचिव मंजिरीताई शेखावत तसेच अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.आर.एम. पाटील तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य शशिकांत कुळकर्णी, डाॅ. एस.बी.पवार, भरत पाटील व दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

वेबिनारच्या बीजभाषक मुंबई विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापिका व स्त्रीवादी साहित्याच्या अभ्यासक डॉ. वंदना महाजन होत्या. त्यांनी भारतीय व पाश्चात्य स्त्रीवादी साहित्याच्या इतिहासाची चिकित्सक मांडणी करून पाश्चात्य आणि भारतीय स्त्रीवादी साहित्यातील नात्यांचा परामर्श घेतला. त्यांनी स्त्रीवादाची पर्यावरणीय चिकित्साही प्रतिपादित केली.

प्रथम सत्रात ‘भारतीय स्त्रियांची कविता’ या विषयावर नांदेड विद्यापीठातील समीक्षक, अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी संपूर्ण भारतीय भाषांतील स्त्रियांच्या कवितांची चिकित्सक मांडणी केली. तसेच स्त्रीवादाची नव्याने चिकित्सा होण्याची आवश्यकताही प्रतिपादित केली.

द्वितीय सत्रात नव्या पिढीतील स्त्रीवादी साहित्याच्या समीक्षक डॉ. योगिता पाटील (धुळे) यांनी स्त्रीवादी मराठी कादंबरीची अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली.

त्यानंतरच्या खुल्या सत्रात शोधनिबंध वाचकांनी आपले शोधनिबंध सादर केले. या सत्राचे अध्यक्ष डॉ. सत्यजित साळवे यांनी शोधनिबंध वाचकांनी सादर केलेल्या शोधनिबंधाची चिकित्सक मीमांसा केली.

वेबिनारच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधा खराटे होत्या. त्यांनी आपल्या प्रासादिक शैलीने लोकसाहित्यातील स्त्री जीवनाचा मागोवा घेतला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.डी. पाटील यांनी आपल्या मनोगतात साहित्याचे जीवनातील महत्त्व प्रतिपादित केले.वेबिनारमध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अभ्यासक व संशोधक तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी अक्षरा मल्टीडिसिप्लिनरी जर्नलचे संपादक डॉ.गिरीश कोळी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. वंदना लव्हाळे तर आभार डॉ. संदीप माळी यांनी मानले.

Copy