संतोष चौधरींची उमेदवाराला मारहाण

0

भुसावळ । शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्ञानेश्‍वर आमले यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या ‘हॉटेल चाहेल पंजाब’ येथे रात्री एक वाजेच्या सुमारास मारहाण केल्याची घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून आमले यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, संतोष चौधरी यांनी असला प्रकार घडलाच नसल्याचा सांगून या प्रकरणाचा साफ इन्कार केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे साकेगाव-कंडारी गटातील उमेदवार रवींद्र नाना पाटील यांनीही संतोष चौधरी यांच्या बाजू घेत आमले यांच्यावर प्रत्यारोप केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक वादग्रस्त होण्याचे संकेत मिळाले आहेत. रात्री झालेल्या घटनेमुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष चौधरी यांच्या विरोधात भादवि कलम 324, 143, 147, 149, 425 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद केली.

नेमके काय घडले ?
या संदर्भात ज्ञानेश्‍वर आमले यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, ते रात्री साडेबाराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील ‘हॉटेल चाहेल पंजाब’ येथून जेवण करून बाहेर निघाले. येथे त्यांना माजी आमदार संतोष चौधरी आणि साकेगाव-कंडारी गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र नाना पाटील हे भेटले. त्यांच्यासोबत सात-आठ समर्थक कार्यकर्ते होते. या सर्वांनी आपणावर अचानक हल्ला चढवून मारहाण करत शिवीगाळ केली. यात आपण जबर जखमी झाल्याचे आमले यांनी तक्रारीत म्हटले आहे. आमले यांनी तातडीने बाजारपेठ पोलीस स्थानक गाठले असता त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले. आमले. प्राथमिक उपचार घेवून सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या नाकाची नस फाटल्यामुळे रक्तस्त्राव बंद होत नसल्याने जिल्हा रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले.

बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
या मारहाण प्रकरणी जखमी ज्ञानेश्‍वर आमले यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यानुसार माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील यांसह इतर तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकेगाव कंडारी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र पाटील हे लढत आहे. त्यामुळे विरोधी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्‍वर आमले यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी झालेल्या शाब्दीक वाद होऊन आमले यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये माजी आमदार चौधरी यांनी गळा पडकून शर्टची कॉलर फाडली. तर इतर तीन जणांनी देखील डोके, नाक व पोटावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसअय नरवाडे करीत आहे.

बदनाम करण्याचा कट
माजी आमदार संतोष चौधरी तसेच राष्ट्रवादी काँग्रसचे तालुकाध्यक्ष रविंद्र नाना पाटील हे रात्री हॉटेल चाहेल पंजाब येथे जेवणाला गेले असता असा कोणताही प्रकार न घडल्याची माहिती तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी सांगितली. ज्ञानेश्‍वर आमले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आमलेंना नाराजी होती. माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीला समर्थन दिल्यामुळे विरोधी गटाच्या लोकांची षडयंत्र केले असल्याचे सांगितले. ज्ञानेश्‍वर आमले हे स्वतः शेतकरी कामगार पक्षातर्फे उमेदवारी लढवित असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारीचा संबंध नसल्यामुळे रविंद्र पाटील यांनी सांगितले. हा सगळा संतोष चौधरी यांना बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप रवींद्र नाना पाटील यांनी केली.

आमदार संजय सावकारे यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे. शहरामध्ये पोलिसांनी कुठेतरी गुंडागर्दीला थारा देऊ नये. अन्यथा चांगले शहर हे गुन्हेगारीकडे वळेल. वेळीच पोलिसांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालण्याची गरज आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कडक शासन व्हावे, अशी मागणी करणार. तसेच गुंडागर्दीचे वातावरण शहरात राहिले तर सर्वसामान्यांना जगणे अशक्य होईल असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.
– संजय सावकारे, आमदार

ज्ञानेश्‍वर आमले हे माझ्याकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तिकिट मागायला आले होते. मात्र त्यांना तिकिट नाकारल्यामुळे ते बेताल आरोप करत असल्याचा प्रत्यारोप माजी आमदार संतोष चौधरी यांनी ‘जनशक्ति’ प्रतिनिधीशी बोलतांना केला. आपण कुणालाही मारहाण केलेली नाही. तसेच आपण असल्या प्रकारचे आरोप करणार्‍यांकडे जराही लक्ष देत नसल्याचे चौधरी म्हणाले
– संतोष चौधरी, माजी आमदार