संघाच्या हेमंत शिबीरात स्वयंसेवकांना शारिरीक, बौध्दीक प्रशिक्षण

0

भुसावळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे 23 रोजीपासून तीन दिवसीय हेमंत शिबीरास ताप्ती पब्लिक स्कुल येथे सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये शनिवारी पहाटेपासून विविध सत्रांना सुरुवात होऊन यात 200 च्या वर स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. सहभागी झालेल्या या शिबीरार्थ्यांना संघाच्या कार्यपध्दतीबद्दल तोंडओळख करुन दिली जात आहे. तसेच त्यांच्याकडून विविध शारिरीक कसरती व बौध्दीक मार्गदर्शन करण्यात येत आहे.

गणांद्वारे केले जातेय मार्गदर्शन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिवाळ्यात विद्यार्थी व तरुणांचा मानसिक, शारिरीक विकास साधून व्यक्तिमत्व विकासासाठी शिबीर घेण्यात येते. यामध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे आपल्या विविध गण पाडण्यात आले असून त्यांना आपापल्या गणाद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.

मैदानी खेळांचा घेतला आनंद
शनिवारी पहाटे 5 वाजता उद्बोधन होऊन 5.30 वाजेच्या सुमारास एकात्मता मंत्राचे सामुहिकरित्या पठण करण्यात आले. यानंतर 6 वाजता संघस्थानावर शिबीरार्थ्यांना दंडप्रहार, सुर्यनमस्कार, योगासने यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विविध खेळांचा आनंद देखील
स्वयंसेवकांनी घेतला.

प्राथमिक माहिती
संघात शाखेला महत्व असून हि शाखा लावण्याच्या पध्दतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. दुपारच्या सत्रात बौध्दीक वर्ग होऊन संघाच्या स्थापनेपासूनची प्राथमिक माहिती देण्यात आली. तसेच चर्चेद्वारे एकमेकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. रविवार 25 रोजी दुपारी 3.30 वाजता परिसरातून संचलन काढण्यात येणार आहे. तर संध्याकाळी 7.30 वाजता समारोप
करण्यात येईल.