‘संगीत शारदा’ 121 वर्षांचे

0

शांताराम वाघ, पुणे

13 जानेवारी 1899, याच दिवशी सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या अशा ‘संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने इंदूर येथे केला. त्या घटनेला आता सुमारे 121 वर्षे झाली आहेत. एका सायंकाळी या नाटकाचे दिग्दर्शक व लेखक गोंविद बल्लाळ देवल हे गप्पा मारत आपल्या मित्रासमवेत हरिपूर येथील कृष्णा नदीच्या काठी संगमावर एका वृक्षाच्या छायेखाली बसले होते. एका वयोवृद्ध संस्थानिकाने एका युवतीबरोबर विवाह केल्याची बातमी त्यांना तेथे कळाली. तेथेच त्यांना 1895-96 च्या दरम्यान ह्या नाटकाची बीजे स्फुरली. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते संगीतमय असून, यातील गाणी किंवा पदे 50 पेक्षाही जास्त आहेत. या नाटकाच्या प्रस्तावनेतच कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी हे नाटक म्हणजे सामाजिक शिक्षण देणारे ठरेल अशी भविष्यवाणी वर्तविली होती. ती अक्षरश: खरी ठरली. त्यातून .‘चाईल्ड मॅरेज अ‍ॅक्ट’ अर्थातच शारदा कायदा 1929 साली अस्तित्वात आला. पूर्वीच्या काळी लहान वयांतच लग्ने होत असत; पण मुलीचे वय कमी व वराचे वय जास्त अशी परीस्थितीही होती. यावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने या नाटकाचे महत्व मोठे आहे. आपला विवाह श्रीमंत पण म्हातार्‍याबरोबर होणार हे जिला कळले आहे अशी निष्पाप कुमारिका आपल्या आईला काय म्हणेल या विचाराने नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांचे कविमन विव्हळ झाले व त्यांतून या काव्यपंक्तीचा जन्म झाला.
तू टाक चिरूनी ही मान, नको अनमान।
नऊ मास वाहिले उदरि तिचा धरि, काही तरी अभिमान ।
तो कसाब झाला तात । करू सजे मुलीचा घात ।
मग बरा तुझा मऊ हात । जा विसरून माया सारी ।
करी घे सुरी, धरी अवसान । हे कठीण दिसे जरी काज ।
विष तरी जरासे पाज । परि ठेवू नकी जगी आज ।
जी दुःख मुलीचे निवारना ती मान नव्हे दुष्मान । 2 ।
या नाटकांत अनेक प्रथितयश अभिनेत्यांनी आपल्या भूमिका केल्या आहेत. त्यामध्ये बालगंधर्व, विष्णुपंत पागनीस, भालचंद्र पेंढारकार यांचा समावेश होतो. अजित कडकडे यांनीही या नाटकांतील पदे गायली आहेत. या नाटकाचा प्रयोग नाशिक येथे 21 डिसेंबर 1909 रोजी विजयानंद चित्रपटगृहांत होता. त्या दिवशी जॅक्सन या ब्रिटीश कलेक्टरचा वध अनंत कान्हेरे यांनी केला. या नाटकाची स्मृती म्हणून हरिपूर, जिल्हा सांगली येथे 13 जानेवारी 1999 रोजी नाटकाच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक प्रयोग सांगलीतील देवल स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. अ‍ॅड. मधुसुदन करमरकर यांनी दिग्दर्शन केले होते. त्यावेळी अभिनेते मास्टर विनायक, भालचंद्र पेंढारकर, वि. भा. देशपांडे उपस्थित होते. हा प्रयोग जिथे या नाटकाची कल्पना गोविंद बल्लाळ यांना सुचली त्या वृक्षाच्या पारावरच, त्याच जागेवर वृक्षाच्या छायेखाली करण्यात आला होता. या नाटकांतील बाल विवाहाच्या प्रथेने लोकांचे लक्ष या महत्वाच्या प्रश्‍नाकडे वेधले गेले. कांचन भट, शारदा, भुजंगनाथ, इंदिराकाकू, भद्रेश्‍वर दीक्षित, कोदंड, कांचनभट इत्यादी पात्रे या नाटकांत आहेत.

Copy