श्रेयसचा द्विशतकी तडाख्याने सराव सामना अनिर्णित

0

मुंबई । श्रेयस अय्यरने द्विशतकी तडाखा देत तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित ठेवून जोरदार आव्हान दिले. ज्या फिरकी गोलंदाजांसह ऑस्ट्रेलियाचा संघ भारताशी दोनहात करणार आहे त्यांना श्रेयसने अक्षरशा शरण आणले. त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम अशी खेळी साकारून निवड समितीचे दार ठोठावले आहेत. शनिवारी 85 धावांवर नाबाद राहणार्‍या अय्यरने रविवारी फक्त दहा मिनिटांत शतक पूर्ण केले. त्याने लिऑन आणि ओकीफे यांच्यावरच विशेष हल्ला चढवला.

वनडे स्टाईल धुतले
अय्यरने कृष्णप्पा गौतमसोबत सातव्या विकेटसाठी 138 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. गौतमने 10 चौकार आणि 4 षटकारांनिशी 68 चेंडूंत 74 धावा केल्या. अय्यर आणि गौतम यांनी सकाळच्या सत्रात स्थानिक क्रिकेटप्रमाणेच फटकेबाजी केली. अय्यरने लिऑनला चार उत्तुंग षटकार ठोकले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवव्यांदा शतकी वेस ओलांडणार्‍या 22 वर्षीय अय्यरने जवळपास पाच तास किल्ला लढवत 27 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करीत नाबाद 202 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 7 बाद 469 धावसंख्येवर डाव घोषित केला होता. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारत ‘अ’ संघाचा पहिला डाव 403 धावांत संपुष्टात आला. पुण्यात 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीच्या पार्श्वभूमीवर हा सराव सामना ऑस्ट्रेलियासाठी निराशाजनक ठरला आहे.