श्री विसर्जनासाठी भाविकांना नदीपात्रात ‘नो एन्ट्री’ : भुसावळात नदीपात्रावरील गर्दी टाळण्यासाठी गणेश मूर्ती संकलनावर भर

भुसावळ : लाडक्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. नदीपात्रात श्री विसर्जन करताना अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर जोर दिला असून यंदा भाविकांना श्री विसर्जनासाठी तापी पात्रात जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस व पालिका अधिकार्‍यांनी नदीपात्रावरील विसर्जन स्थळाची बुधवारी पाहणी केली तर शहरातील नगरसेवकांची शहरातील प्रभाकर हॉलमध्ये बुधवारी दुपारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत पेालीस अधिकार्‍यांनी शहरातील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील गणेशमूर्ती संकलीत करून नदी काठावर आणण्याचे आवाहन करण्यात आले. नगरसेवकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

नगरसेवकांनी सहकार्य केल्यानंतर नदीपात्रावरील गर्दी टळणार
शहरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाकर हॉलमध्ये बुधवारी दुपारी शहरातील नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. नदीपात्रावरील गर्दी टाळण्यासाठी प्रभागात नगरसेवकांनी गणेशमूर्ती संकलीत कराव्यातव नंतर त्या श्री विसर्जन ठिकाणी आणाव्यात, असे आवाहन पोलीस अधिकार्‍यांनी केले. नगरसेवक युवराज लोणारी म्हणाले की, प्रभागात कृत्रिम तलाव करून त्यात श्रींचे विसर्जन करण्यावर भर देण्यात येईल तर नगरसेवक प्रमोद नेमाडे म्हणाले की, प्रभागातून ट्रॅक्टरची सोय करून श्री मूर्ती विसर्जन स्थळी आणण्यात येतील. नगरसेवक प्रा.सुनील नेवे म्हणाले, शहरात गणेश मूर्ती संकलन केंद्र सुरू करावेत तसेच राहुल नगराजवळही श्री मूर्ती संकलनाची सोय उपलब्ध करून द्यावी.

यंदा भाविकांना नदीपात्रावर ‘नो एंट्री’
लाडक्या गणरायाला निरोप देताना होणार्‍या दुर्घटनांचे प्रमाण पाहता यंदा गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी किंवा घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन करताना भाविकांना नदीपात्रात जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून 60 सदस्यांचे जीवनरक्षक दल तैनात करण्यात येणार असून या दलातील स्वयंसेवकांच्या हाती गणेशमूर्ती देवून विसर्जन करता येणार असल्याचे पालिकेचे उपमुख्याधिकारी महेंद्र कथोरे यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने तापीपूलाच्या पश्चिमेकडील राहूल नगर घाट तसेच रेल्वे फिल्टर हाऊस घाट या दोन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे.

यंदा कृत्रीम कुंड नाही
गेल्या वर्षी पालिकेने तसेच विविध संस्थांनी विसर्जनासाठी कृत्रीम कुंड साकरले होते, यंदा मात्र पालिकेकडून कृत्रीम कुंड किंवा मूर्ती संकलन केंद्र राहणार नाही. लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक भागात मूर्ती संकलन केंद्र सुरू करावे यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी आवाहन केले आहे. भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत 142 सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाचे विसर्जन होईल. दरम्यान, विसर्जनासाठी रात्री दहा वाजेची वेळ असली तरी सूर्यास्तापूर्वी विसर्जन करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे.

Copy