Private Advt

श्री छत्रपती ब्लड फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

राजस्थान येथे जीवन माळी यांनी स्वीकारला पुरस्कार

नंदुरबार। सोशल मीडियातून शेकडो रक्तदात्यांना एकत्र आणत त्यांच्यात रक्तदानाचे महत्व पटवून देत रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत हजारो गरजूंना रक्तदान करुन ‘जीवनदान’ देणार्‍या श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ देवून राजस्थानमधील कोटा येथे गौरव करण्यात आला. फाउंडेशनचे जीवन माळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

रक्तदान चळवळीत काम करणारी राष्ट्रीय स्तरावरील राजस्थानमधील कोटा येथील ह्यूमन सोशल फाउंडेशन या संस्थेच्यावतीने रक्तदान जीवनदान समितीद्वारा कोटा येथे कोटा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ या पुरस्कारांचा वितरण सोहळा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. यावेळी देशातील रक्तदानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या संस्थांचा आणि व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॉन्फरन्सला कोटा येथील महापौर राजीव अग्रवाल, ज्येष्ठ समाजसेवक अमित धारिवाल, ह्यूमन सोशल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक सचिन सिंगला, रक्तदान जीवनदान सेवा समिती कोटाचे संस्थापक नीरज सुमन आदी उपस्थित होते.

संस्थेचे सचिव गोपाल विजयवर्गीय यांनी रक्तदान चळवळीत काम करणार्‍या संस्थांचा आणि व्यक्तींच्या कार्याचा गौरव करत इतरांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाउंडेशन व्हॉटस्अ‍ॅप गु्रपच्या माध्यमातून दररोज गरजू रुग्णांना स्वयंस्फूर्तीने रक्तांच्या पिशव्या उपलब्ध करुन देणे, तसेच जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासल्यास शेकडो बॅग उपलब्ध करुन देण्याचे कौतुकास्पद काम निस्वार्थपणे करण्यात येते. यामुळे गु्रपच्या कार्याची दखल ह्यूमन सोशल फाउंडेशनच्यावतीने घेत राष्ट्रीय स्तरावरचा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ देवून गौरव करण्यात आला. हा अवॉर्ड ग्रुपचे जीवन माळी यांनी स्वीकारला.

दात्यांनी स्वत:हून रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन
हा पुरस्कार माझा नसून सर्व रक्तदात्यांचा आहे. रक्तदान केल्याने एखाद्या गरजू रुग्णांचा जीव वाचत आहे. त्यातून मिळणारा आशीर्वाद सर्वात मोठे पुण्य आहे. यामुळे दात्यांनी स्वत:हून रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन जीवन माळी यांनी केले. श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनच्या चळवळीत महेंद्र झवर, रामकृष्ण पाटील, अरुण साळुंखे, अजय देवरे, हितेश कासार, आकीब शेख व सुधीरकुमार ब्राह्मणे यांचे योगदान लाभत असल्याचेही माळी यांनी सांगितले.