श्री छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षांचा राजीनामा

0

गैरव्यवस्थापनामुळेच कारखाना कर्जात बुडाल्याची जोरदार चर्चा; 500 कोटींपेक्षा जास्त कर्ज

बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हा राजीनामा देताना घोलप यांनी प्रकृती अस्वस्थ्याचे कारण दिले असले तरी सभासदांमध्ये मात्र वेगळेच तर्कवितर्क लढविले जात आहेत. 30 सप्टेंबरला कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली आणि दुसर्‍याच दिवशी पुणे येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे घोलप यांनी राजीनामा दिला.

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना राज्यात एकेकाळी नावाजलेला कारखाना म्हणून ओळखला जात होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत या कारखान्यावर 500 कोटींपेक्षा जास्त कर्ज असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले जात आहे. कारखान्याचा अप्रत्यक्ष कारभार हा दोन संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या हाती एकवटला होता, अशीही सभासदांमध्ये चर्चा सुरू आहे. कारखान्याच्या गैरव्यवस्थापनामध्ये कारखाना प्रचंड कर्जात डुबला गेल्यामुळे त्याची जबाबदारी ही अध्यक्षांवरच येत असते. अशीही एक चर्चा कारखान्याच्या
सभासदांमध्ये आहे.

अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे?

श्री छत्रपती कारखान्याचे 23 हजार सभासद असून कारखाना हा बारामती इंदापूर या दोन तालुक्यांच्या हद्दीवर असून कार्यक्षेत्रही या दोन तालुक्यांमध्ये आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील राजकारण ढवळून निघत आहे. गेली सात वर्षे अमरसिंह घोलप हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. अचानकपणे राजीनामा दिल्यामुळे कारखान्याच्या भवितव्याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. यापुढील काळात व येणारा गाळप हंगामात अध्यक्षपदाची धुरा ही कोणाच्या गळ्यात पडणार? याचेही विश्‍लेषण केले जात आहे.

सभा गाजतात आरोप-प्रत्यारोपांनी

या कारखान्याच्या सर्वसाधारण सभा या आरोप प्रत्यारोपांनी चांगल्याच गाजत असतात. या कारखान्याचा सभासद हा अभ्यासू सभासद म्हणून ओळखला जातो, अशीही या कारखान्याची ख्याती आहे. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून कारखान्याच्या अनेक भानगडी बाहेर येत आहेत. याचाही धागा या घटनेमुळे समोर येत आहे. मागील गाळप हंगामात या कारखान्याचा ऊस गाळपासाठी मोठ्या प्रमाणात खासगी साखर कारखान्याला गेला होता. याचाही ठपका संचालक व व्यवस्थापनावर ठेवण्यात आला होता. मात्र याच्यातून कसेतरी सावरत कारखाना सुरू राहीला. यावर्षी पुन्हा अशीच गंभीर परिस्थिती निर्माण होते की काय? अशी सभासदांमध्ये चर्चा आहे.

 

Copy