शोकाकुल वातावरणात शहिदांना निरोप

0

मुंबई। काश्मीरमध्ये हिमस्खलनात शहीद झालेले जवान आनंद गवई, संजय खंडारे व गणेश ढवळे यांच्या पार्थिवावर बुधवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहिदांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. शहीद जवान गणेश ढवळे यांच्या पार्थिवावर बुधवारी वाई तालुक्यातील आसरे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ढवळेंच्या निरोपाला लोटला जनसागर
आसरे येथे 14 जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या तीन फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान गणेश ढवळे यांचे पार्थिव वाई तालुक्यातील आसरे येथील निवासस्थानी आज सकाळी आणण्यात आले. अमर रहे अमर रहे गणेश ढवळे अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा वैभवनगर येथील स्मशानभूमीत पोहोचली. या ठिकाणी पालकमंत्री शिवतारे, आमदार पाटील, जिल्हाधिकारी मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख, पोलीस अधीक्षक पाटील यांनी वीरपिता किसन ढवळे यांचे सांत्वन केले. त्यानंतर वीरपिता किसन ढवळे, वीरपत्नी रेश्मा, वीर माता राधाबाई आणि वीर भगिनी जयश्री, भाग्यश्री आणि निर्मला यांनी पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले. काश्मीरमधील हिमस्खलनात अकोल्यातील वाशिम रोडस्थित पंचशीलनगरमधील आनंद शत्रुघ्न गवई आणि मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील संजय सुरेश खंडारे यांना 25 जानेवारी रोजी वीरमरण आले. पंचशिल नगरमधून शहीद आनंद गवई यांची अंंत्ययात्रा काढण्यात आली. गीता नगरस्थित स्मशानभूमीत आनंद यांच्यावर तर माना येथे संजय खंडोर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहिदांचे कुटुुंबीय, राजकीय नेते, विविध शासकीय संघटना, सैनिक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलीस आणि सैन्य दलाच्या जवानांनी हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली.