शॉर्टसर्किटच्या आगीमुळे फुटले कंपनीतील लाखोंच्या गुटख्याचे बिंग

0

एमआयडीसीतील जे सेक्टरमधील आशिर्वाद पॉलीमर्समधील घटना ; महिनाभरापासून एमआयडीसी पोलिसांसह अन्नऔषधी प्रशासन अनभिज्ञ कसे?

जळगाव- शहरातील एमआयडीसी परिसरातील जे सेक्टरमधील आशिर्वाद पॉलीमर्स या कंपनीत शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी सकाळी 6 वाजता घडली. जिल्हाभरातील 27 बंबाने ही आग दुपारी 1.30 वाजता आटोक्यात आली. या कंपनीत आवारातच भाडेतत्तावर मुंबईच्या एका कंपनीचे गोडावून होते, त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कंपनीत बंदी असलेला लाखो रुपयांचा गुटखाही मिळून आला असून आगीमुळेच येथील गुटख्याचे भिंग फुटले आहे. महिनाभरापासून हा लाखो रुपयांचा साठा असलेला गुटखा कंपनीत असतांनाही याबाबत एमआयडीसी पोलीस तसेच अन्नऔषधी प्रशासन अनभिज्ञ कसे? असाही प्रश्‍नही उपस्थित होत असून आगीतून संशयाचा धूर निघत आहे.

अयोध्यानगरातील दिलीप भिका शिरसाठ यांच्या मालकीची एमआयडीतील जे सेक्टर 18 मध्ये आशिर्वाद पॉलीमर कंपनीत आहे. या कंपनीत चटई व प्लास्टिक खुर्चीसाठी लागणारे कच्चे माल तयार होते. या कंपनीत 6 गोडावून असून त्यापैकी दोन गोडावून शिरसाठी यांनी भाडेतत्वावर दिले आहेत. त्यातील एक मुंबई येथील स्विफ्ट टेक्नॉन प्रा. लि. नावाच्या कंपनीचे गोडावून आहे. तर दुसरे बन्सीलाल भगवानदास खत्री रा. मलकापूर यांना भाडेतत्तावर देण्यात आले आहे.

कामगारासह सुरक्षारक्षक पाचही जण बचावले
कंपनीत शनिवारी सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. यावेळी कंपनीत अमरीश मिश्रा, राजेश तिवारी, छोटेलाल, रोहिल भागेलाल हे चार कामगार तसेच कंपनी आवारात वास्तव्यास असलेल्या वॉचमन विकास भिमराव मिश्रा त्याचे कुटुंब होते. आगीचा प्रकार कळताच वॉचमन विकास मिश्रा या कंपनीतील कामगार बाहेर पडले. मिश्रा यांनी कंपनी मालक शिरसाठ यांना माहिती दिली. त्यानुसार सहा वाजेच्या सुमारास शिरसाठ यांची पत्नी शोभा शिरसाठ, मुलगा अभिजित तसेच स्विफ्ट टेक्नॉन कंपनीचे प्रतिनिधी नरेंद्र पुरूषोत्तम जोशी रा. पिंप्राळा यांनी कंपनी गाठली. वेळीच प्रकार कळाल्याने कामगार बचावले नाहीतर जिवीतहानी घडली असती. कंपनीमालक तसेच इतरांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन करुन आगीची माहिती दिली.

जिल्हाभरातील 27 बंबांनी आग आटोक्यात
एमआयडीसीतील अग्निशमन विभागाला माहिती दिली. मात्र हाकेच्या अंतरावर असतांनाही ते एक तास उशीराने आले. त्याचे कार्यालयात गेल्यावर त्यांनी पाणी नसल्याचे सांगितल्याची माहिती, शिरसाठ यांचा मुलगा अभिजित याने दिली. यानंतर तासाभरानंतर महापालिकेचे बंबांसह जैन इरिगेशनसह, वरणगाव, वरणगाव फॅक्टरी, आदी ठिकाणच्या अग्निशमन घटनास्थळी पोहचले. सकाळी 6 वाजेला लागलेली आग, दुपारी 2 वाजेपर्यंत धुसमुसत होती, महापालिकेच्या बंबांनी आग विझविण्याचे काम सुरु होते. 27 अग्निशमन बंबानंतर दुपारी दीड वाजता आग आटोक्यात आली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, इम्रान सय्यद यांनी घटनास्थळ गाठून आग विझविण्याकामी मदतकार्य केले.

आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान
या आगीत आशिर्वाद पॉलीमर्स कंपनीतील दोन प्लॅस्टिक दाणा बनविण्याच्या मशीनरी, मिस्कर, अ‍ॅग्लो, ग्राईंडर, इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटर्स, वायर्स, ऑफिसचे फर्नीचर, कॉम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरे, कच्चा माल, सर्व गोडाऊन, इलेक्ट्रिक फिटींग्स असे एकूण एक कोटी वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कृष्णा मराठ यांच्या मालकीच्या स्विफ्ट टेक्नोप्लॉस्ट प्रा. लि. या मुंबईच्या कंपनीचे गोडावून मधील 2750 प्लॅस्टिकचे पॅलेट, 900 प्लॅस्टिक क्रेट खाक झाले असून 72 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बन्सीलाल खत्री यांचा गोडावूनमधील मोठ्या प्रमाणावर गुटखाही खाक झाला आहे.

कंपनीत लाखोंचा गुटखा आला कसा?
काही प्रमाणात आग नियंत्रणात आल्यानंतर याठिकाणी सामान जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु होते. याठिकाणी जळालेल्या वस्तूंमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेला राज्यात बंदी असलेला ‘बॉम्बे 1000‘ या नावाचा गुटखा व राजनिवास पान मसाला असा लाखो रुपये किंमतीचा गुटखाही मिळून आला. एमआयडीसी पोलिसांनी अन्न औषधी प्रशासनाला पत्र दिले. यानंतर अन्न औषधी विभागाच्या कर्मचारी,अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठले. गुटख्याबाबत कंपनीचे मालक शोभा शिरसाठ यांना विचारले असता, त्यांनी याबाबत कुठलीच माहिती नसल्याचे सांगितले. तसेच महिनाभरापूर्वी बन्सीलाल खत्री या भाड्याने गोडावून दिले असून होते. त्यांनी चॉकलेट, बिस्कीट, गोळ्यांच्या मालाबाबत माहिती दिली होती, असे शिरसाठ यांनी सांगितले.

कोणाच्या आशिर्वादाने गुटख्याचा साठा की, कारखाना ?
प्रत्यक्ष घटनास्थळावर आल्यावर गुटखा दिसून आला. लाखो रुपयांच्या गुटख्याचा बन्सीलाल खत्री या व्यक्तीचा असल्याचे समोर आले आहे. मोठ्या प्रमाणावर गुटखा मिळून आल्याने याठिकाणी गुटख्या कारखाना असल्याची शक्यता असून महिनाभरापासून हा गुटखा कंपनीत असतांनाही एमआयडीसी पोलीस तसेच अन्न औषधी प्रशासन अनभिज्ञ कसे? असे विविध प्रश्‍न उपस्थित होत आहे. पोलीस व अन्न औषधी प्रशासनाच्या आशिर्वादानेच तर हा गुटखा याठिकाणी साठविला जात नव्हता ना? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी शोभा शिरसाठ यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. तसेच एमआयडीसी पोलिसांनी गुटख्याबाबत कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला पत्र दिले आहे. पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक गोरे यांना दिली.

Copy