शेष भारत इराणी कपचा किंग

0

मुंबई : खराब सुरुवातीनंतर देखील वृद्धिमान साहाचे शानदार नाबाद द्विशतक आणि कर्णधार चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या बळावर शेष भारतने इराणी करंडकावर आपले नाव कोरले. चार खेळाडू ६३ धावांवर तंबूत परतल्यानंतर ३७९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या शेष भारतची अवस्था बिकट झाली होती. मात्र यानंतर आलेल्या वृद्धिमान साहा (२०३) आणि कर्णधार चेतेश्वर पुजारा (११६) यांच्या विक्रमी ३१६ धावांच्या जबरदस्त भागीदारीच्या बळावर संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. पूर्णपणे बॅकफुटवर असलेला संघाने पुजारा आणि साहाच्या जोरदार खेळीने अनपेक्षितरीत्या विक्रमी विजय मिळवला आहे. साहाच्या या खेळीने त्याने टीम इंडियात वापसीचे संकेत दिले असून पार्थिव पटेल काहीअंशी मागे पडल्याचेच दिसून आले.

द्विशतकवीर साहाला सामनावीराचा पुरस्कार
शेष भारतचा दुसरा डावही पहिल्या डावाप्रमाणे गडबडला. सलामीवीर अखिल हेद्वाडकर (२०) व अभिनव मुकुंद (१९) आपल्या खेळीला मोठा आकार देऊ शकले नाहीत. यानंतर करून नायर आणि मनोज तिवारी प्रत्येकी ७ धावांवर तंबूत परतल्याने शेष भारतची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. मात्र कर्णधार चेतेश्वर पुजाराने एकीकडून संयमी खेळी करत चिवट फलंदाजीचे दर्शन दिले. त्याच्यानंतर आलेल्या साहाने जबरदस्त खेळीचे प्रदर्शन करत शानदार द्विशतक ठोकले. पाचव्या दिवशी शेष भारत संघाला विषयासाठी 113 धावांची आवश्यकता होती. दोघांनी एकही विकेट न पडू देता नाबाद ३१६ धावांची भागीदारी करत संघाला ६ गड्यांनी विजय मिळवून दिला. द्विशतकवीर साहाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. साहाने द्विशतक ठोकत संघात वापसीचे संकेत दिले असून पार्थिव पटेलचा मार्ग खडतर झाला आहे.

चिरागची झुंझार खेळी वाया
फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या शेष भारत संघाच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करुन गुजरातच्या दुसऱ्या डावावर नियंत्रण मिळवीत गुजरातला २४६ धावांवर गुंडाळले. पहिल्या डावातील १३२ धावांच्या आघाडीमुळे गुजरातने ३७९ धावांचे लक्ष्य शेष भारत समोर ठेवले होते. पहिल्या डावातील दीडशतकवीर चिरागने या डावात ७० धावांची खेळी करून डावाला आकार दिला होता. दोन्ही डावात झुंझार खेळी करणाऱ्या चिराग गांधीची खेळी मात्र वाया गेली. शेष भारतकडून नदीमने शानदार गोलंदाजी करत ४ गडी बाद केले. कौलने ३ तर मोहम्मद सिराजने २, पंकज सिंगने १ गडी बाद करत चांगली साथ दिली होती. रणजी जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या गुजरात संघाला विजयाची संधी होती मात्र त्यांनी ती गमावली.

क्रिकेटरसिकांना अनिश्चिततेचा प्रत्यय
पंचांबद्दल अपशब्द वापरणारा गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलला अखेरच्या सत्रात दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. पार्थिवपुढील अडचणी एकीकडे वाढत असताना शेष भारताच्या वृद्धिमान साहाने चिकाटीने खेळपट्टीवर पाय रोवत द्विशतक झळकावले आणि आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. गुजरातच्या गोलंदाजीपुढे सुरुवातीला ४ बाद ६३ अशी केविलवाणी अवस्था झाल्यानंतर शेष भारताचा संघ इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या दिवशीच नामशेष होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र कर्णधार चेतेश्वर पुजारा आणि वृद्धिमान यांच्या खेळीने जोरदार विजय मिळवून दिला. क्रिकेटच्या अनिश्चिततेचा प्रत्यय इराणी स्पर्धेच्या या सामन्यात क्रिकेटरसिकांना आला. शेष भारताची सुरुवातीची अवस्था पाहता पाचव्या दिवसापर्यंत सामना लांबणार नाही, असे वाटत होते. मात्र कसोटी क्रिकेटमधील चिवट फलंदाजीचा अनुभव असलेल्या पुजारा आणि साहाने सामन्याचे चित्रच पालटून टाकले.

साहा शांत तर पार्थिव आक्रमक
गेल्या वर्षी इराणी सामन्याच्या पहिल्या डावात सहाशे धावांपर्यंत मजल मारणाऱ्या मुंबईचा दुसरा डाव लवकर आटोपला. मग ४८० धावांचे लक्ष्य शेष भारताने अनपेक्षितपणे पेलले होते. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा यंदा अनुभवायला मिळाली. सामन्यानंतर आपल्या झुंजार खेळीबद्दल साहा म्हणाला, ‘‘कोणतेही दडपण न घेता गुजरातच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करण्याची रणनीती मी आखली आणि ती यशस्वी ठरली. माझ्यात आणि पार्थिवमध्ये कोणतीही वैयक्तिक स्पर्धा नाही. दोघेही आपला खेळ उंचावण्यासाठी खेळतो.’’ पुजाराला आवश्यक असलेला अतिरिक्त साइट स्क्रीन गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने पंचांच्या निदर्शनास आणून दिला. खेळण्याची स्थिती ही संपूर्ण सामन्यात सारखीच असावी लागते, या नियमाचा आधार घेत पार्थिवने हा आक्षेप घेतला होता. त्यामुळे पंचांनी त्वरित तो काढून टाकण्याचे निर्देश दिले.