Private Advt

शेलवडच्या विद्यार्थिनीचा अ‍ॅपे रीक्षातून पडल्याने मृत्यू

बोदवड : धावत्या अ‍ॅपे रीक्षातून पडल्याने बोदवड तालुक्यातील शेलवडच्या 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तृप्ती भगवान चौधरी (17, शेलवड, ता.बोदवड) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

घरी परतताना दुर्घटना
शेलवड येथील तृप्ती भगवान चौधरी (17) ही विद्यार्थिनी बोदवड येथील न.ह.रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. महाविद्यालयाची वेळ सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे गुरुवारी शिक्षणासाठी आली. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड येथे घरी ऑटोरीक्षाने निघाली. यावेळी ती अ‍ॅपे रीक्षाच्या पुढील सीटवर मैत्रिणीसोबत बाहेरील साईडने बसली होती. बोदवडपासून दोन किमी अंतरावर अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रीण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रीक्षातून खाली पडल्या. तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने जळगावला नेताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला.

विद्यार्थिनी ठरली एस.टी.संपाचा बळी
तृप्तीची मैत्रिण रोहिणी हिलाही मार लागला आहे. तृप्ती अभ्यासात हुशार विद्यार्थिनी होती. घरची परिस्थिती जेमतेम असूनही बोदवड येथे अकरावी सायन्सला प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करत होती. तिला आठवीत शिकणारा एक चौदा वर्षीय भाऊ आहे. जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. यानंतर तृप्तीवर दुपारी चार वाजता शेलवड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी.चा संपाचा तिढा सुटला नसल्यानेच अशा अप्रिय घडत असल्याने समाजमन संतप्त झाले आहे.