शेतात विष प्राशन करून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

0

अकोला : शेतीत सतत होणारी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गांधीग्राम येथे शनिवार, १ डिसेंबर रोजी सकाळी घडली. शेख उमर शेख मन्नान (४७) आणि नजरुन बी शेख उमर (४३) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

गांधीग्राम येथील शेख उमर यांच्याकडे दोन ते अडीच एकर शेत असून, यावरच त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. गेल्या काही वर्षांपासून नापिकीचा सामना करावा लागत असलेल्या शेख उमर याच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५० ते ६० हजार रुपयांचे कर्ज आहे. शुक्रवारी सकाळी शेख उमर व त्याची पत्नी नजरुन बी दोघेही शेतात कापूस वेचणीसाठी गेले. त्या ठिकाणी दोघांनीही किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. माहिती समजताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.