शेतजमीन विकणे आहे

0

जिल्हा- उस्मानाबाद
तालुका-उमरगा
कवठा गावाच्या शिवारातील तेरणा नदीच्या काठावरील लातूर-उमरगा रोडटच असलेली बारमाही पाण्याखालची जमीन विकणे आहे. ‘लढा’मध्ये दरवेळी संघर्षाची कहाणी मांडतो. आज अचानक जमीन विक्रीची जाहिरात कशी? असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. पण जर लेखासोबत छापलेली जमीन विक्रीची जाहिरात तुम्ही लक्षपूर्वक वाचली, तर सहजच लक्षात येईल जाहिरातीचे वेगळेपण.

जमीन विकायची असते. जमीन विकली जाते. जमीन विकावीही लागते. मात्र, कारणं वेगवेगळी असतात. कधी जमीन नको असते. कधी आर्थिक अडचण असते. कधी कर्जफेड करायची असते. पण ती कर्जफेडही स्वत:ची असते. दुसर्‍यांची नाही. दुसर्‍यांच्या कर्जफेडीसाठी स्वत:च्या जमिनीची विक्री अगदी समाजाला समर्पित झाले असल्याचे सांगणारेही करत नसतात. मात्र, या जाहिरातीत जे म्हटले आहे त्यानुसार कवठ्याच्या विनायक पाटील यांना जमीन विकायची आहे ती जमेल तेवढ्या शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी. जाहिरातीतील हे वाक्य वाचलं आणि थेट विनायकरावांना फोन लावला.

विनायकराव तेव्हा वाशिमहून नांदेडकडे निघाले होते. गडबडीत होते तरी बोलायला लावलं. ते बोलू लागले. शेतकरी माणसाचे एक बरं असतं. ते बोलू लागले की, अगदी पाटातल्या अवखळ पाण्यासारखे मोकळेपणाने प्रवाही बोलतात. उगाच विचार करून, ठरवून अवघडत बोलत नसतात. त्यांनी सांगितलं. अहो! शेतकर्‍यांच्या रोज आत्महत्या होतात. आमच्या मराठवाड्यात दिवसाला चार शेतकरी मृत्यूला कवटाळत असतात. कोणीच काही करत नाही हो. राजकारण सुरू आहे नुसतं. सरकार काही करत नाही. विरोधी पक्षही संघर्ष करण्यातच गुंग आहे. शेतकरी मात्र रोजच आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे मीच ठरवले आपणच काही करायचे.

विनायकरावांनी खूप विचार केला. राजकारण्यांकडे प्रयत्न करून झाले. पण काहीच घडताना दिसत नव्हते. त्यांनी स्वत: प्रयत्न सुरू केले. लक्षात आले उस्मानाबाद आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण जास्त आहे. स्वत: फिरायला सुरुवात केली. माहिती जमा करू लागलो. परिस्थितीची भीषणता अधिकच बोचू लागली. त्यातून मनातला निर्धार अधिकच पक्का झाला. काहीही झालं तरी चालेल पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आपल्याला जे जमेल ते सर्व करायचं. प्रसंगी स्वत:चं सर्वस्व गमवायला लागलं तरी चालेल. पण काहीतरी करायचं. राजकारण्यांसारखं फक्त बाता नाही मारायच्या. फक्त आव नाही आणायचा. आपण शेतकरी आहोत. आपणही त्रास काढतो. पण आपले काही बांधव एवढे गांजले जातात. गांजवले जातात की, त्यांना जीवन जगणंच अवघड नाही, तर अशक्य होऊन जातं.

माहिती मिळवताना विनायकरावांच्या लक्षात आलं की कर्जफेड करू न शकलेल्या शेतकर्‍यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थकबाकीदार शेतकरी आहेत. त्यामुळे सर्वांनाच गांजलेले समजण्याची आवश्यकता नाही. काहींनी कर्ज फेडलेले नसते ते वेगळ्या कारणांनी. त्यामुळे सरसकट कर्जमुक्त करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी मग काही शेतकर्‍यांशीच चर्चा केली. काही निकष ठरवले. ज्यांच्या घरात कोणीतरी सरकारी किंवा खासगी सुरक्षित नोकरीत आहे ते वगळले. जे कंत्राटे घेतात, अगदी रग्गड 10-20 लाखांचा कंत्राटे घेतात, त्यांना वगळले. जे पुढारी आहेत. एक कोटी कर्ज घेतात. कर्ज वाढवतात. मग मस्त कर्जमाफीसाठी राजकारण करतात. ते वगळले. सरपंच आहेत, त्यांना वगळले.

विनायकरावांनी पुढे जे सांगितले ते महत्त्वाचे, ज्या शेतकर्‍यांना कोणीच नाही. आधारच नाही. जो कर्ज फेडूच शकत नाही. कर्ज फिटू शकत नसल्याने जो आत्महत्या करू शकतो, त्याचे कर्ज फेडायचे. विनायकरावांनी स्वत: फिरून अशा गरजू शेतकर्‍यांची यादी तयार केली. ते बँकांशी बोलले. बँकांनी अशा शेतीकर्जाची एकरकमी परतफेड होणार असेल, तर 50टक्के सूट देण्याची तयारी दाखवली. मी एक सामान्य माणूस जर अशी सूट मिळवू शकतो, तर सरकारला का मिळणार नाही? कशाला 30 हजार कोटी लागतील? असा रोकडा सवालही त्यांनी विचारला.

बँकांनी सूट दिली, तरीही विनायकरावांनी जे शेतकरी निवडले त्यांच्या कर्जफेडीसाठी पैसे लागणार. ते आणायचे कुठून तर त्यासाठीच स्वत:ची जमीन विकायची. हे ते पहिल्यांदा करत आहेत, असेही नाही. ते गावात शाळा चालवतात. स्वत:च्या खर्चाने त्यांनी गावचा ओढा आणि तेरणा नदीच्या काही बागांचे खोलीकरण केले. त्यासाठी स्वत:चे घरही विकले. आता त्यांच्या मुलाला भाऊ सांभाळतो. ते स्वत: एका शेडमध्ये राहतात. मला वाटते शेतकरी कर्जमुक्तीसाठी आपापल्यापरीने सारेच प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी, विरोधक सारेच. जास्त काही नको. विनायकरावांसारखी स्वत:ची जमीन-घर काहीही विकायला नको. फक्त कर्जमाफी देण्यासाठी त्यांनी जी वर्गवारी केली, त्यांनी जशी बँकांकडून 50 टक्के सूट मिळवली तशी सरकारलाही मिळवता येईल. शेतकर्‍यांना खरोखरंच उपकार न करता मदत करता येईल. त्यांच्या पायावर उभे करता येईल. निसर्गाच्या प्रतिकूलतेशी झुंजत तुमच्या-माझ्या पोटाची सोय करणार्‍या बळीराजाला कुणाच्या दयेची गरज नसतेच. गरज असते ती त्याच्या हक्काची साथ देण्याची.

राजकारण्यांनी विनायकरावांच्या कर्जमुक्ती पॅटर्नचा आदर्श ठेवावा. घर-दार विकू नये. पण शेतकर्‍यांसाठी योग्य मार्ग काढावा. घर विकले, जमीन विकता आहात, तुमच्याकडे उरले काय? असे विचारले तेव्हा विनायकराव म्हणाले, दिवंगत अब्दुल कलामांना मी गुरू मानायचो. दर गुरुपौर्णिमेला त्यांचे आशीर्वाद घेत असे. माझ्या शेतकर्‍यांसाठीचे कार्य माहिती झाल्यावर त्यांनी चिठ्ठी लिहून कौतुक केले. त्यांची ती चिठ्ठी हीच माझी मालमत्ता! ईडीची कारवाई ओढवून घेण्याइतपत बेहिशेबी मालमत्ता जमवणार्‍यांपैकी किती जणांकडे विनायकरावांकडच्या चिठ्ठीएवढी अमूल्य मालमत्ता असते?
(लेखक दै. जनशक्ति मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत.)

तुळशीदास भोईटे – 9833794961