शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनेची विरोधकांना साथ

0

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर गुरूवारी विरोधी पक्षांना सत्ताधारी शिवसेनेनेही साथ दिली. याच मुद्द्यावर शिवसेनेच्या मदतीने विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेसह विरोधक आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या गदारोळानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे कामकाज पहिल्यांदा १५ मिनिटांकरीता आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केले.

प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. मागच्या दोन वर्षांत राज्यात नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या झाल्याचा आरोप त्यांनी केला. या आत्महत्त्यांसाठी सरकारचे शेतीविषयक धोरण कारणीभूत आहे. या आत्महत्त्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी दिली पाहिजे. आजच्या आज ही घोषणा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

शेतकऱ्याला जोपर्यंत त्याच्या मालाला किफायतशीर भाव मिळत नाही तोपर्यंत तो समाधानी होऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टीने सत्तेवर येण्यापूर्वी स्वामिनाथन समितीचा अहवाल १०० टक्के अंमलात आणण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांना नुसती कर्जमाफी नको तर त्यांना कर्जमुक्ती हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भरपूर पैसा आहे. परदेशातून भरपूर पैसा त्यांनी आणला आहे. आज उत्पादक खरेदी यंत्रणा ठप्प आहे. ती व्यवस्थितपणे चालली पाहिजे, नोटाबंदीनंतर राज्यात सर्वत्र शेतमालाची खरेदी अत्यंत कमी दरात झाली. शेतकऱ्यांना लुटण्याचे काम या महाराष्ट्रात झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत सभागृहातले कामकाज आम्ही चालू देणार नाही, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी दिला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या मगाणीचे समर्थन केले. उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्जमाफी करण्याचे आश्वासन देऊ शकतात तर येथे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी केला.

किती आत्महत्त्यांनंतर सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करणार, असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावे व नऊ मार्च हा चांगला दिवस मानून त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी, असे ते म्हणाले. अनिल परब, राहुल नार्वेकर यांनीही आपली मते मांडली.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयावर बोलताना शेतकऱ्यांची कर्जातून कायमची मुक्तता करण्यासाठी सरकारने अनेक पायाभूत योजना हाती घेतल्या असल्याचे सांगितले. गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच सिंचनावरील एकही पैसा कमी करण्यात आलेला नाही, असेही ते म्हणाले. अमरसिंह पंडित तसेच धनंजय मुंडे यांनी यावेळी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून सदस्य आक्रमक झाले. त्यामुळे निर्माण झालेल्या गदारोळानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू होताच मुंडे आपला हरकतीचा मुद्दा पुढे मांडू लागले. तेव्हा राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले. सत्ताधारी भाजपाचे सदस्यही त्याला प्रत्त्युत्तर देऊ लागले. दोन्ही बाजू आक्रमक झाल्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.