शेतकर्‍यांसाठी पाडव्याला नवी शेतयोजना

0

मुंबई। राज्यातील शेतकर्‍यांच्या शेती उत्पादनात वाढ व्हावी आणि आत्महत्येचे सत्र कुठे तरी थांबावे, या उद्देशाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी ही नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. ही योजना 28 मार्च 2017 रोजी अर्थात गुढीपाडव्यापासून राज्यात सुरू करण्यात येणार असून, या योजनेमुळे राज्याच्या शेती उत्पादनात दुपटीने वाढ होणार असल्याचा दावा राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी खास जनशक्तिशी बोलताना केला.

या योजनेंतर्गंत शेतकर्‍यांना पेरणीसाठी बी-बियाणे, खते, सूक्ष्मद्रव्ये आणि शेतीसाठी आवश्यक असलेली अवजारे पुरवण्यात येणार आहेत. या योजनेसाठी किमान 5 हेक्टरपासून ते 25 हेक्टरपर्यंतची जमीन निश्‍चित केली जाणार असून, त्यानंतर त्या शेतकर्‍याला आवश्यक ती शेती अवजारे आणि खते, बियाणांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जमीन निश्‍चितीसाठी जिल्हानिहाय असलेल्या कृषी सहाय्यक अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून, हे अधिकारी शेत जमीन निश्‍चित करण्यात येणार आहे तसेच अधिकार्‍यांकडून निश्‍चित करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना या सुविधा देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हवामानाचा अंदाज पाहून पीक-पेरणीच्या अनुषंगाने सल्ला देण्याचे कामही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

त्याचबरोबर शेतजमिनीच्या माती परीक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थायी स्वरूपात मृदू परीक्षण शाळा स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार नाही. सद्यपरिस्थितीत प्रत्येक मृदू परीक्षण शाळेला 40 लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना खास खरीप हंगामासाठीच तयार करण्यात आली आहे.