शेतकर्‍यांना कर्जमुक्ती दिली नाही तर लढा अटळ

0

औरंगाबाद : शेतकर्‍यांचा अंत कोणी पाहू नये, शेतकर्‍यांचा अंत म्हणजे आपल्या सर्वांचा अंत आहे. मुख्यमंत्र्यानी कर्जमाफीची वेळ मागितली होती, महिना झाला तरी कर्जमाफी झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी शेतकर्‍यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळाली नाही तर लढा अटळ आहे, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजप सरकारला दिला. आजपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला औरंगाबादमधून सुरुवात झाली आहे. यानिमित्त औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी हा इशारा देत भाजपविरोधात दंड थोपटल्याचे सूचित केले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियानातंर्गत रविवारी उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. ज्या सत्तेत आहोत त्या सत्तेकडून शेतकर्‍यांना न्याय मिळतो का हा प्रयत्न टोकाला जाऊन करावा लागणार आहे. मग नाही झाला तर लढत आलीच, असे स्पष्ट संकेत उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियाना अंतर्गत मी कर्जमुक्त होणार ही संकल्पना राबवणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, जो शेतकरी कर्ज मागेल त्याला सरकारने कर्ज दिले पाहिजे. तसेच तूर खरेदीसंदर्भात घातलेल्या अटी शिथिल करून मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकर्‍याची सर्व तूर राज्य सरकारने खरेदी करावी, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी टीकेची झोड उठवली. सध्या राज्यात यात्रेचे पेव फुटले आहे. सत्तेत असताना शेतकर्‍यांचे दुःख समजले नाही. आता विरोधीपक्षात गेल्यावर शेतकर्‍यांचे दुःख समजले का? असा थेट सवाल ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना केला आहे.

मिशन 2019 की मध्यावधी निवडणुकीचे?
मराठवाडा दौर्‍यात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेतील संभाव्य उमेदवारांची यादी मागवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत, की मध्यावधी निवडणुकांच्या, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. आज मध्यावधी निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत असे सुतोवाच दोन दिवसांपूर्वी ठाकरे यांनी केले होते. शिवसेना पक्षप्रमुखांच्या शिवसंपर्क अभियानात मध्यावधी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा सुरू होती.

समृध्दी महामार्गातील शेतकर्‍यांनी घेतली ठाकरेंची भेट
समृध्दी महामार्गाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. या महामार्गातील रस्त्यावर हजारो शेतकर्‍यांची घरे, शेततळे, म्हशीचे तबेले, बगीचे आदी आहेत. त्यामुळे बेघर होऊन जमीन देण्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. आम्हाला कितीही पैसे वाढवून दिले तरी जमीन देणार नाही, अशी भूमिका शेतकर्‍यांनी ठाकरे यांच्याकडे मांडली. शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचे आश्‍वासन ठाकरे यांनी दिल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. मागील आठवड्यात समृध्दी महामार्गाला विरोध करण्यासाठी शहापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी सहभागी झाले होते. शेतकर्‍यांना कर्जमाफी, समृद्धी महामार्ग इत्यादी प्रश्‍नांवर खासदार राजू शेट्टी यांनी उध्दव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली हेाती. त्यावेळी समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या प्रकरणात शिवसेना शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली होती.