शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी तृतीयपंथीयांचे आंदोलन

0

पुणे : राज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी पुण्यातील तृतीयपंथीय रस्त्यावर उतरले असून, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी अन्नत्याग आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काही काळ या आंदोलनात भाग घेत, आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.

राज्य सरकारचे शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा आंदोलकांनी केला. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. सरकार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर ठोस भूमिका घेत नसल्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो असून, अन्नत्याग आदोलन करत आहोत. या आंदोलनाची राज्य सरकारने दखल न घेतल्यास तीव्र लढा उभा करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.

दळभद्री सरकारच्या डोळयात अंजन घालण्याचे काम तृतीयपंथीयांनी अन्नत्याग आंदोलानातून केले आहे, असे खासदार शेट्टी म्हणाले. समाजातील दुर्लक्षित अशा वर्गातून शेतकर्‍यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाची सरकार कशी दखल घेणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.