शेतकर्‍यांच्या हातावर ‘तुरी’

0

मुंबई। राज्यातील शेतकरी कर्जामुळे बेजार झालेला आहे. अशातच राज्यातील काही जिल्ह्यांवर दुष्काळाचे आणि अवकाळी पावसाचे संकट आहे. तूर खरेदीबाबत सरकारने केलेले नियोजन पुर्णपणे फसलेल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशा आस्मानी आणि सुलतानी संकटांशी सामना करत असलेल्या राज्यातील शेतकर्‍यांच्या हातावर तुरी देवून राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि 15 आमदार परदेश दौर्‍यावर रवाना झाले आहेत. हे सर्वजण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौर्‍यावर गेले आहेत. मंत्री आणि आमदारांचा हा ‘अभ्यास दौरा’ दोन आठवड्यांचा असणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये शेतकर्‍यांना देण्यात आलेल्या कर्जातून कसा मार्ग काढला जातो, याचा अभ्यास करण्यासाठी मंत्री आणि आमदार परदेश दौर्‍यावर गेले आहेत. या दौर्‍यावरून परतताना कृषिमंत्री आणि आमदार एक दिवस सिंगापूर येथेही थांबणार आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या ‘अभ्यास दौर्‍या’साठी प्रत्येक व्यक्तिला सहा लाखांचा खर्च येणार आहे. यामधील निम्मा खर्च कृषिमंत्री आणि आमदार स्वत:च्या खर्चातून करणार आहेत. तर उर्वरित खर्च सरकारी तिजोरीतून म्हणजेच सामान्य करदात्याच्या खिशातून केला जाणार आहे.

कृषिमंत्री आणि आमदारांचा दौरा ‘अभ्यास दौरा’ असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. ‘इतर देशांमधील चांगल्या योजना आणि उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी असे दौरे आवश्यक असतात,’ असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला ‘अभ्यास दौर्‍या’साठी जाणार्‍या शिष्टमंडळात विरोधात असलेल्या काँग्रेस आमदारांचादेखील समावेश आहे.

राज्यभरातील शेतकर्‍यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने शेतकर्‍यांना 1 लाखांपर्यंत कर्जमाफी दिल्यानंतर राज्यात कर्जमाफीसाठी विरोधकदेखील आक्रमक झाले आहेत. मात्र अद्याप तरी मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

यंदाच्या वर्षात आतापर्यंत 700 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतांश शेतकरी दुष्काळाचा फटका बसलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत. दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफीसोबतच पिकाला हमीभाव मिळावा, यासाठी शेतकर्‍यांचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आता कृषिमंत्री आणि आमदारांचा हा अभ्यास दौरा चांगलाच गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.