शेतकर्‍यांचे अनुदानासाठी शासनाचे दुर्लक्ष

0

पाचोरा । तालुक्यातील जिरायतदार व बागायतदार शेतकर्‍यांचे थकित अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदारांच्या खात्यात जमा होऊन महिनाभर झाल्यावर देखील शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम न टाकल्याने अखेर शेतकर्‍यांना सोमवार 6 फेब्रुवारीपासून लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ आली आहे. पाचोरा तालुक्याचे शेतकर्‍यांचे दुष्काळ निधीचे पैसे गेल्या वर्षभरापासून थकीत रक्कमेच्या 3 कोटी 59 लाख रुपयांपैकी 2 कोटी 10 लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयातून पाचोरा तहसीलदार यांच्या खात्यात गेल्या महिनाभरापासून आलेला असून देखील सदर रक्कम शेतकर्‍यांना अडचण असल्यावर आणि वारंवार शेतकर्‍यांनी तहसील कचेरीत खेट्यामारून सुद्धा शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले गेले.

लेखी निवेदन देवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
नोटबंदीत व शेतमालाला भाव नसल्याने आधिच शेतकरी आर्थिक विवंचनेत असतांनाही गांभिर्य न घेतल्याने 24 जानेवारी 2017 रोजी लेखी स्वरूपात निवेदन देवून देखील आणि उपोषणाची सूचना दिल्यावर महसूल विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकर्‍यांना सोमवार 6 फेब्रुवारीपासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली होणार असून ज्या शेतकर्‍यांना अद्यापही जिराईत व फळबागाईतचा दुष्काळ निधी मिळाला नसेल त्यांना या लाक्षणिक उपोषणाला पाठींबासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.