Private Advt

शेतकर्‍यांची कामे होत नसल्याने अ‍ॅड. रवींद्रभैय्यांचा संचालकपदाचा राजीनामा

जिल्हा बँक प्रशासनासह अध्यक्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

जळगाव – जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. याठिकाणी शेतकर्‍यांना सोयीचे होईल असेच काम झाले पाहिजे. पण दुर्दैवाने तसे होत नसल्याने आपण संचालक पदाचा राजीनामा जिल्हा बँकेच्या अध्यक्षांकडे बंद लिफाफ्यात पाठविला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी ‘दै. जनशक्ती’शी बोलतांना दिली. दरम्यान अ‍ॅड. रवींद्रभैय्यांच्या राजीनाम्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पुर्ण झाला असला तरी कोरोनामुळे निवडणूका लांबल्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान राष्ट्रीयकृत आणि व्यावसायिक बँकांप्रमाणे जिल्हा बँकेचाही व्यवहार अधिक सुलभ आणि सोयीचा व्हावा यासाठी एटीएम कार्डसह एनइएफटी, आरटीजीएस यासारख्या सुविधा सुरू करण्यात आल्या. मात्र जितक्या सोयी सुविधा वाढल्या तितकीच आर्थिक व्यवहारांची प्रक्रियाही क्लिष्ट झाली असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.
शेतकर्‍यांना अपुर्ण कर्जासह इतर विषयांबाबत नाराजी
जिल्हा बँक ही शेतकरी हितासाठी काम करीत असते. पण शेतकरी हितच जर जोपासले जात नसेल तर त्या संस्थेविषयी नाराजी पसरते. शेतकर्‍यांनी १०० टक्के कर्जाची मागणी करूनही त्यांना ५० टक्के कर्ज मिळणे, मंजूर कर्ज एटीएमद्वारे देणे यासह जिल्हा बँकेच्या शाखांमधील कर्मचार्‍यांच्या बदल्या, शेतकर्‍यांना चांगली सेवा न मिळणे यावरून शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकर्‍यांचीच कामे होत नसतील तर ते पद काय कामाचे? त्यामुळे शेतकरी हितासाठीच आपण संचालक पदाचा राजीनाम जिल्हा बँकेच्या अध्यक्षांकडे बंद लिफाफ्यात पाठविला असल्याचे अ‍ॅड. रवींद्रभैय्या यांनी सांगितले.
बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील हे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आहेत. गेल्या २५ वर्षापासून ते जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रतिनीधीत्व करीत आहे. त्यांचे वडील स्व. प्रल्हादभाऊ पाटील यांचा वारसा त्यांनी निष्ठेने सुरू ठेवला आहे. असे असतांना त्यांनी अचानकपणे राजीनामा देणे म्हणजे एक प्रकारे जिल्हा बँक प्रशासनासह अध्यक्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
राजीनामा मिळाला नाही – जितेंद्र देशमुख
जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील यांच्या राजीनाम्याबाबत माहिती मिळाली. पण त्यांचा राजीनामा माझ्यापर्यंत पोहोचला नसल्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.