शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा अर्थसंकल्प : विनोद तावडे

0

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा आणि शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करणारा तसेच शेतकरी कर्जमुक्त व्हावा यादृष्टीने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यालाही अर्थसंकल्पामधून दिलासा मिळाला आहे. कृषी क्षेत्राचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांवर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. उर्जा, उद्योग, पाणीपुरवठा या क्षेत्रासाठी योग्य तरतूद करतानाच राज्यातील शिक्षण आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीला महत्त्व देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

कर्जमाफीऐवजी फक्त आश्वासनांची ‘गाजरे’ – राधाकृष्ण विखे पाटील

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची ‘पारदर्शक’ फसवणूक झाली असून कर्जमाफीऐवजी केवळ आश्वासनांची ‘गाजरे’ मिळाल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले तर विश्वासघात मिळाला. फसवणूक मिळाली. प्रतारणा मिळाली. अपेक्षाभंग मिळाला. यु-टर्न मिळाला. वचनभंग मिळाला आणि आश्वासनांची गाजरे मिळाली, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक संकटात लोटणारा ‘अनर्थ’संकल्प – धनंजय मुंडे

अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा न झाल्याने दुष्काळाने पीडित लाखो शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. नोटाबंदीमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरला आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असताना अर्थसंकल्पात नियोजनाचा अभाव दिसत आहे. घोषणांचा सुकाळ व स्वप्नांचे इमले असलेल्या या अर्थसंकल्पाने राज्याला आर्थिक संकटात लोटले आहे. हा अर्थसंकल्प नाही तर ‘अनर्थ’संकल्प आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

सर्व घटकांचा भ्रमनिराश करणारा अर्थसंकल्पः अशोक चव्हाण

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे. पण त्यात कोणत्याही ठोस योजना नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता वाऱ्यावर सोडले आहे. हा अर्थसंकल्प सर्वच घटकांचा भ्रमनिरास करणारा असून दिशाहीन आणि शेतकरीविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.