शेतकरी, नोटाबंदीचे मुद्दे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात गाजणार

0

जळगाव (प्रदीप चव्हाण) । जिल्ह्यासह राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहत आहे. राजकीय पक्ष तयारीला लागले असुन राजकीय पक्षाकडुन इच्छुकांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहे. अर्ज माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन खर्‍या अर्थाने निवडणूक प्रचाराला प्रारंभ होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष जाहिरनाम्यानिशी प्रचारात दाखल होणार आहे. निवडणुकीच्या केंद्रस्थानी शेतकरी हा घटक प्रमुख राहणार असुन शेतकर्‍यांसह नोटबंदी, रस्ते दुरुस्ती तसेच विविध विकासात्मक मुद्यांचा निवडणुक प्रचारात समावेश असणार आहे. निवडणुक रिंगणात सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांसह विरोधी पक्षातील उमेदवारांकडून आश्‍वासनांची खैरात उधळली जाणार आहे.

नोटबंदीचा मुद्दा गाजणार
नुकतीच जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतची निवडणुक पार पडली. एैन नगरपालिका निवडणुकीच्या काळातच नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय पक्षांसाठी तो आयती मुद्दा ठरला. सर्वच पक्षाकडुन नगरपालिका निवडणुकीत हा मुद्दा अधिक गाजला. या निवडणुकीत देखील हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे. जिल्ह्यासह केंद्र राज्यात सत्तेत असलेले पक्ष नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनार्थ मुद्दे प्रचारात मांडतील तर विरोधी पक्ष नोटाबंदीच्या निर्णयाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांसह ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान हे मुद्दे मांडतील.

अर्थसंकल्पातील मुद्दे प्रचारात
बुधवारी 1 रोजी केंद्र सरकारकडुन केंद्रीय आणि रेल्वे अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला असुन समानता साध्याचा प्रयत्न झाले आहे. अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना थेट लाभ देण्याचे कोणताही प्रयत्न झालेला नसल्याचा मुद्दा विरोधक मांडतील. तर सत्ताधारींकडून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मनरेगा, विमा वाढ, महिलांसाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदींची आकडेवारी जनतेसमोर मांडली जाईल. विरोधक कर्जमाफीचा मुद्दा मांडतील.

सोशल मीडियात चर्चा
गेल्या अनेक दिवसांपासुन अनेकांना जिल्हा परिषद निवडणुकीची चाहुल लागली होती. इच्छुकांची निवडणुक आणि उमेदवारी जाहिर होण्याअगोदरच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जनतेपर्यत पोहचण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार असुन सोशल मिडीयावरील चर्चेला उधाण आले आहे. जो तो सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रचार करतांना दिसत आहे.