शुक्राच्या मोहिमेत इस्त्रोसह भागीदारी करण्याची नासाची इच्छा

0

बंगळुर । पृथ्वीच्या शेजारील ग्रह असलेल्या शुक्रावर जाण्याची मोहीम भारत राबवणार असून, मंगळावरही आणखी एक मोहीम राबवणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच केंद्र सरकारने यासाठी तरतूद केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आपल्या आगामी अवकाशमोहिमेत तब्बल 104 उपग्रह एकाच वेळी अवकाशात सोडणार असल्याच्या पाश्‍वर्र्भूमीवर या नव्या मोहिमांना अधिकृत मान्यता मिळाल्याने भारतीय संशोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोणत्याही देशाने एकाच वेळी इतके उपग्रह अवकाशात सोडलेले नाहीत. रशियाने 2014 मध्ये 37 उपग्रह अवकाशात सोडून विक्रम प्रस्थापित केला आहे. नियोजनानुसार, 15 फेब्रुवारीला पीएसएलव्हीद्वारे तीन भारतीय आणि 101 विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करून भारत नवा इतिहास रचणार आहे.

गेल्या काही काळातील इस्रोच्या कामगिरीवर केंद्र सरकार खूश असल्याने त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अवकाशशास्त्र विभागाच्या निधीमध्ये तब्बल 23 टक्के वाढ केली आहे. या निधीचा वापर दुसरी मंगळ मोहीम आणि शुक्र मोहिमेसाठी करायचा आहे.

केंद्र सरकारचा पुढाकार
इस्रोने केलेल्या नियोजनानुसार, मंगळ मोहिमेला 2021-2022 मध्ये सुरुवात होणार असून, मंगळावर रोबो उतरवला जाणार आहे. भारताची पहिली मंगळ मोहीम पूर्णपणे स्वदेशी होती. या दुसर्‍या मोहिमेत मात्र रोबोची निर्मिती करून सहकार्य करण्याचा प्रस्ताव फ्रान्सच्या अवकाश संस्थेने दिला आहे. किमान मंगळावर सध्या असलेल्या नासाच्या वाहनाचा आणि इस्रोचा संपर्क व्हावा, यासाठी या रोबोवर टेलेमॅटिक्स मोड्युल बसवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबचे संचालक मायकेल वॅटकिन्स यांनी म्हटले आहे. शुक्र ग्रहाबाबत फारशी माहिती उपलब्ध नसल्याने ही मोहीमही अत्यंत महत्त्वाची असल्याचे वॅटकिन्स यांनी सांगितले. त्यामुळे या मोहिमेसाठी इस्रोबरोबर भागीदारी करण्याची नासाची इच्छा आहे.