‘शिवाजीयन्स’चा 2-1 ने शानदार विजय

0

पुणे । आय-लीग फुटबॉल स्पर्धेत शिलाँगच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ही लढत झाली. शिवाजीयन्स संघाने शिलाँग लजाँग संघावर 2-1 असा शानदार विजय मिळवला. शिवाजीयन्स संघाचा हा प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर मिळवलेला पहिलाच विजय ठरला.
या लढतीच्या पंधराव्या मिनिटाला संजू प्रधानने गोल करून शिवाजीयन्स संघाचे खाते उघडले. यानंतर लढतीच्या 35व्या मिनिटाला असिएर पिएरिक डिस्कने गोल करून शिलाँग लजाँग संघाला बरोबरी साधून दिली.

असिएर यंदाच्या आय-लीगमध्ये सर्वाधिक गोल करणार्‍या खेळाडूंच्या यादीत 7 गोलसह अव्वल स्थानावर पोहोचला. कॅमेरूनचा असिएर गेल्या मोसमात शिवाजीयन्स संघाकडेच होता.

यानंतर शिवाजीयन्स संघाने बरोबरी साधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. लढतीच्या 43व्या मिनिटाला शेन मॅकफॉलने गोल करून शिवाजीयन्स संघाला पूर्वार्धात 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून शिवाजीयन्सने विजय मिळवला. या लढतीत दोन्ही संघांच्या गोलकीपरनी चमकदार कामगिरी केली. शिवाजीयन्सची आता 15 फेब्रुवारीला मिनेर्व्हा पंजाब संघाविरुद्ध लढत होईल. शिवाजीयन्स संघ गुणतक्त्यात 9 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. आठ लढतींमधील हा त्या संघाचा दुसराच विजय ठरला. यात शिवाजीयन्सला तीन लढतींत पराभव पत्करावा लागला आहे, तर तीन लढती बरोबरीत सुटल्या आहेत.