शिवस्मारक आणि विनायक मेटे

0

राजकीय खेळी खेळण्यासाठी वा शह देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या कार्यक्रमात आपला मित्रपक्ष असलेल्या आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद भूषवणार्‍या नेत्याची अशी उपेक्षा करणे, हे भारतीय संस्कृतीचे झेंडा मिरवणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या राजकीय शिष्टाचारात बसते का? आणि म्हणूनच शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते, शिवस्मारकाच्या जलपूजनाचे श्रेय विनायक मेटेंना मिळू नये यासाठीच भाजप नेत्यांनी राजकीय डावपेच आखले असा आरोप करीत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मावळत्या वर्षात भारतीय जनता पक्षाने मुंबईतील अरबीसमुद्रात होऊ घातलेल्या ‘शिवस्मारका’ची पायाभरणी करून निवडणुकीत दिलेले वचनपूर्तीचे कर्तव्य पार पाडले. हा कार्यक्रम होऊन एक सप्ताह लोटला तरी नववर्षातही त्याचे कवित्व सुरूच आहे. विशेष करून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे कार्यकर्ते, अनुयायी व हितचिंतक आपली नाराजी लपवू शकलेले नाहीत. त्याला कारणही तसेच आहे.

2014 च्या निवडणुकीच्या राजकीय आखाडाच्या वेळी राष्ट्रवादी पक्षाचा त्याग करून विनायकराव मेटे शिवसेना-भाजप महायुतीत सामील झाले. शिवसेना-भाजप युती तुटल्यावर त्यांनी भाजप आघाडीत राहायचे ठरवले तेव्हापासून ते भाजपसोबतच आहेत. शिवसंग्राम ही संघटना मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील शिवस्मारक हे दोन प्रमुख मुद्दे घेऊन विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असते.

राज्यात भाजप महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात पंधरा वर्षे रखडलेल्या शिवस्मारकाच्या कामाला वेग यावा म्हणून विनायक मेटे यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद दिले. मेटे यांच्या अध्यक्षतेखाली शिवस्मारकाच्या कामाच्या फाइली हलू लागल्या आणि अडथळे दूर होत गेले. असे पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जलपूजनप्रसंगी हॉवरक्राफ्टमध्ये पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत जागा न देणे तसेच वांद्रे कुर्ला संकुलातील कार्यक्रमात शिवस्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून विनायक मेटेना मनोगत व्यक्त करण्याची भाषण करू न देणे यामागचे गृहीतिक कुणालाही न समजण्यापलीकडचेच होते. राजकीय खेळी खेळण्यासाठी वा शह देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या कार्यक्रमात आपला मित्रपक्ष असलेल्या आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद भूषवणार्‍या नेत्याची अशी उपेक्षा करणे, हे भारतीय संस्कृतीचे झेंडा मिरवणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या राजकीय शिष्टाचारात बसते का? आणि म्हणूनच शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते, शिवस्मारकाच्या जलपूजनाचे श्रेय विनायक मेटेना मिळू नये यासाठीच भाजप नेत्यांनी राजकीय डावपेच आखले, असा आरोप करीत आहेत. या आरोपांकडे पाहता, शिवस्मारकासाठी विनायक मेटे यांचे खरेच काही योगदान आहे का? याचा धांडोळा घेतल्यास त्यात तथ्य आढळून येते. 1990 च्या दशकात विनायक मेटे मराठा महासंघात कार्यरत असताना 1994-95 शिवसेना-भाजप युतीसोबत मराठा महासंघ सामील होता. युती सत्तेत आल्यावर मराठा महासंघाने मेटे यांना युतीतर्फे विधानपरिषदेत आमदार बनवले. तेव्हापासून मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईतील अरबी समुद्रात भव्य स्मारक व्हावे, असा विषय लावून धरलेला होता तो अजूनपर्यंत.त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवस्मारकाचा अभ्यास करण्यासाठी सुधीर जोशींच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नेमली होती. 1999 ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यावर विनायक मेटे आपल्या सहकार्‍यांसोबत राष्ट्रवादीत सामील झाले. तेथेही त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासपीठावर शिवस्मारकाचा विषय मांडला. त्यामुळे 2004च्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यात शिवस्मारकाच्या बांधणीचा उल्लेख करावा लागला होता. आघाडी सरकारने 2005 ला छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईच्या लगत अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने शिवस्मारकाची फक्त घोषणा केली. 2009 ला 2011 पर्यंत शिवस्मारक बांधून पूर्ण होईल, असे आश्‍वासन दिले, पण पुढे काहीच झाले नाही. या काळात सत्तेत सहभागी असतानाही विनायक मेटे यांनी आपल्या शिवसंग्राम संघटनेच्या व्यासपीठावरून रस्त्यावर व विधानपरिषदेच्या माध्यमातून सभागृहात शिवस्मारकाचा विषय तापत ठेवत सरकारला धारेवर धरले होते. मुळातच शिवस्मारकाची कल्पना आणि मांडणी मेटे यांची असल्याने आघाडी सरकार त्याची पूर्तता करण्यास चालढकल करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी 2014 ला राष्ट्रवादी पक्ष सोडला.

आपल्या शिवसंग्राम संघटनेच्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण व शिवस्मारकाचा मुद्दा मांडत 2014 च्या निवडणुकीच्या काळात ते महायुतीत सामील झाले व भाजपसोबत राहिले. शिवस्मारकाच्या बांधणीपर्यंतचा असा हा 1990 पासूनचा इतिहास व त्यासाठी विनायक मेटे यांनी केलेला संघर्ष महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद विनायक मेटे यांना दिले.

शिवस्मारकाचे जनक असलेल्या व्यक्तीलाच समितीचे अध्यक्षपद देऊन मुख्यमंत्र्यांनी मेटेंचा सन्मान केलेला असताना शिवस्मारकाच्या कार्यक्रमात त्यांनाच दूर ठेवण्यामागे कारण काय? हात दाखवून अवलक्षण करणारे हे उपटसुंभ आहेत तरी कोण? मुख्यमंत्र्यांनी त्यांचा जरूर शोध घ्यावा!

– दखलनामा
विजय य. सामंत
9819960303