शिवस्मारकासाठी श्रेयाची रस्सीखेच

0

मुंबई : शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचा सरकारी खर्चाने महापालिका निवडणुकीसाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी सरसावलेल्या भाजपचा अजेंडा अखेर उघडा पडला, शिवसेना-भाजप या दोघांचीही स्मारकाच्या श्रेयासाठी दुर्दैवी रस्सीखेच सुरू असताना स्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी हा शिवमय नव्हे तर भाजपमय सोहळा असल्याचा आरोप करून चेंबूरपासून सुरू झालेली कलश शोभायात्रा अर्ध्यावर सोडून जाणे पसंद केले. शिवसेना, मनसे आणि मेटे या तिघांची तोंडे यावरून तीन दिशेला झाल्यामुळे शनिवारच्या समारंभात आता नेमके कोणते रामायण घडते याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

शनिवारी मुंबई येथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन होणार आहे. या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही, यावरून आधीच वाद झाले. सन्मानपूर्वक आमंत्रण मिळाल्यावर अखेर त्यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले. मात्र या स्मारकाचे श्रेय एकट्या भाजपला मिळावे, अशी व्यूहरचना केली गेली आहे. त्याचे प्रत्यंतर स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांमध्ये येऊ लागले . नाशिक येथे गुरुवारी झालेल्या गोदावरी नदीच्या जल संकलन कार्यक्रमापासूनही भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला चार हात दूर ठेवल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या एकाही स्थानिक पदाधिकार्‍याला कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपने दिले नव्हते, असे सांगण्यात आले. यातच विनायक मेटे यांच्या पवित्र्याने उद्याच्या कार्यक्रमात काय होणार? याबाबत उत्सुकता लागली आहे.

शोभायात्रा म्हणजे भाजपचे निव्वळ शक्तीप्रदर्शन
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे शुक्रवारी काहीसे नाराज झाले. शिवस्मारकाच्या कलश यात्रेतून मेटेंनी काढता पाय घेत भाजपवर टीका केली. शोभायात्रा सुरु होण्यापूर्वी विनायक मेटे चेंबूरमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, मात्र त्यांनी शोभायात्रेत सहभागी होणे टाळले. कलशांची शोभायात्रा म्हणजे भाजपचे निव्वळ शक्तीप्रदर्शन असल्याची नाराजी मेटेंनी व्यक्त केली. कलशयात्रेमधे चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार असे भाजपचे दिग्गज नेते-मंत्री सहभागी झाले होते. मात्र विनायक मेटेंनी शोभायात्रा कार्यक्रम अर्ध्यात सोडून जाणे पसंत केले. गेट वे ऑफ इंडियाजवळ कलश यात्रेचा समारोप झाला. कलशांची शोभायात्रा म्हणजे वर्चस्वाची लढाई बनली आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केले जात आहे. हा कार्यक्रम महाराजांच्या सन्मानासाठी नाही तर केवळ शतप्रतिशत भाजप हा अजेंडा राबवण्यासाठीच दिसत आहे. वातावरण शिवमय वाटण्याऐवजी भाजपमय वाटत असल्याची टीका विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख खासदार राजू शेट्टी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. हा कार्यक्रम म्हणजे भाजपने आपली खासगी मालमत्ता बनवली असून हे बरोबर नसल्याची प्रतिक्रीया शेट्टी यांनी दिली आहे.

शिवसेनेची पोस्टरबाजी
शिवस्मारकाचे भूमिपूजन तोंडावर आलेले असताना शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे आहेत. दादरमधील शिवसेना भवन परिसरात रातोरात शिवसेनेने पोस्टर झळकवल्यामुळे हा वाद पुन्हा टोकाला जाण्याची शक्यता आहे. ‘शिवस्मारक व्हावे ही बाळासाहेबांची इच्छा’ अशी पोस्टरबाजी शिवसेनेने केली आहे. आपला योग्य तो सन्मान राखला गेला, तर शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती लावू, असे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानंतर भाजप मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे निमंत्रण देण्यासाठी उद्धव यांच्या घरी म्हणजेच मातोश्रीवर गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

भाजपची जाहिरात मनसैनिकांनी पुसली
शिवसेना-भाजपमधील श्रेयवादात आता मनसेनेही उडी घेतली आहे. शिवस्मारकाच्या भूमिपूजनाबाबत दादरच्या कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात मनसैनिकांनी पुसली आहे. कोहिनूर टॉवरची भिंत पक्षाची असल्याचा दावा करत मनसेने भाजपची जाहिरात हटवली. शिवसेना भवनासमोरच्या कोहिनूर टॉवरच्या भिंतीवर आधी मनसेची जाहिरात होती. मात्र ही जाहिरात पुसून भाजपने शिवस्मारकाच्या भूमिपूजनाबाबत मोदींची जाहिरात लावली. यामुळे आक्रमक झालेल्या मनसेने भाजपची जाहिरात पुसली.

मेटे आजच्या कार्यक्रमाला जाणार की नाही?
अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह फक्त सहा जण जाणार आहेत. भूमिपूजन आणि जलपूजनाला समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती जाणार आहेत. मात्र, यामध्ये विनायक मेटे नसणार आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. इतकेच नव्हे तर उद्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार का नाही ठरवले नाही, अशी प्रतिक्रिया विनायक मेटेंनी दिली आहे. त्यामुळे श्रेयवादाच्या नादात भाजप आपल्या मित्रपक्षांनाच नाराज करत असल्याने पुढे नक्की काय घडणार हे पाहणे औत्सुक्तेचे ठरणार आहे.