शिवस्मारकाच्या भुमिपूजनाची तयारी पूर्ण

0

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी म्हणजेच 24 डिसेंबरला होणार्‍या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तयारीची माहिती घेण्यासाठी मंगळवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर तसेच नौसेना आणि तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली.

अरबी समुद्रातील मरीन ड्राईव्हवर होणार भुमीपूजन
मरीन ड्राईव्हपासून आत समुद्रात अडीच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या खडकावर शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान मोदी यांना या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी गिरगाव चौपाटीहून खडकाजवळ थांबवण्यासाठी विशेष हॉवरक्रॉफ्ट बोटीचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री फडणवीस, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे आणि राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय असे निवडक लोक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी मारीन ड्राइव्हच्या संपूर्ण परिसरात सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात येणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर वांद्रे येथील एम. एम. आर. डी. ए.च्या मैदानात पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे आणि साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सरदार घराण्यातील सन्माननीय व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे.

इतिहासाचे प्रतिबिंब
आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राची तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेऊन प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे, यासाठी 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करून त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजुर करण्यात आला आहे.

छत्रपतींचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा
या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकाचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षा विषयक व्यवस्था, आदी बाबींचा समावेश आहे. येत्या 3 वर्षात स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांचे जीवनमुल्य प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे.