शिवसैनिक-भाजपा कार्यकर्त्यांना युती नकोच!

0

मुंबई । शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेले काही दिवस मुंबईतील शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नेते, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत आहेत. आज त्यांनी शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांशी-लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. सर्वांचा एकच सूर उमटत आहे भाजपाशी युती नको! विधानसभेला गाफिल राहिलो. तरी एकाकी लढून 63 मिळवल्या. आता तयारीनं उतरु स्वबळावर भगवा फडकवू. दुसरीकडे भाजपा नेत्यांना भेटणारे स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेते हेच सांगत शिवसेनेशी यावेळी युती नकोच! लोकसभेला त्यांना आपल्यामुळे तीन खासदार निवडून आणता आले, विधानसभेला आपण स्वबळावर ताकत दाखवली आताही दाखवूच. मात्र एकीकडे दोन्हीकडे दोन्ही पक्षांचे सामान्य कार्यकर्ते युती नकोच म्हणत असताना दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना मात्र कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यांना युतीचा पोपट काहीही झाले तरी मरु द्यायचा नाही.

कार्यकर्त्यांना वाटतेय संधी
भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांना यावेळी प्रथमच आपल्या राजकीय कारकीर्दीत नगरसेवक मिळवण्याची संधी देणारी निवडणूक वाटत आहे. त्यांच्यापैकी अनेकांना आजवर युतीमुळे त्यांच्या वॉर्डात साधे इच्छूकही होता आले नाही. आता मात्र विदानसभेच्या यशानंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्याने त्यांनी युती नकोच वाटते, कारण युती झाल्याने जिंकायची शक्यता वाढत असली तरी मुळात त्यासाठी उमेदवारी मिळावी लागते ती शक्यताच थेट 50 टक्क्यांपेक्षाही जास्तने कमी होते. खासदार किरीट सोमैयांसारख्या नेत्यांनाही आजवर शिवसेनेविरोधात राबवलेल्या मोहीमांमुळे आता युती झाली तर लोकांसमोर काय बोलायचे हा प्रश्न भेडसावतो. त्यांनी शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी जे केले त्याची शिवसैनिकांनी दिलेली प्रत्युत्तरे त्यांना विसरावे म्हटले तरी विसरता येणार नाहीत, अशीच आहे, त्यामुळे त्यांनाही युती नकोच वाटते. शिवसेनेच्या गोटातही तसेच आहे. एकीकडे दोन्ही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना युती नकोच वाटत असताना दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना युतीचा पोपट कोणत्याही परिस्थितीत मरु द्यायचा नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारीला वचननामा प्रकाशित करताना भाजपाला चिमटे काढले मात्र थेट वार करणे टाळले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही थेट शिवसेनेवर टीका करणे टाळत आहेत. 25 जानेवारीला रात्री युतीबद्दलच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. 27 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत त्याआधी युतीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.