शिवसेनेला डावलण्याच्या तयारीत भाजप

0

मुंबई : शिवस्मारकाच्या भूमीपूजनानंतर जी सभा होणार आहे तिथे तसचे प्रत्यक्ष भूमीपूजना वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उपस्थिती राहील की नाही याबाबत अजूनही संभ्रम कायम असून श्रेयाच्या लढाईत शिवसेनेला डावलण्याच्या तयारीत भाजप असल्याचे आता बोलले जात आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परीषदेतही याबाबतचा स्पष्ट खुलासा केला नाही. त्यांच्या उपस्थिती संदर्भात स्वतः मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलत आहेत असे सांगून मेटे यांनी ठाकरेंच्या उपस्थिती बाबतच्या प्रश्नांचे उत्तर टाळले.

विख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या हातून घडलेला किमान 120 ते 125 मीटर उंचीचा शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा अरबी सागरातील पंधरा हेक्टरच्या खडक तसचे मानव निर्मित बेटावरील किमान 80 मीटर उंचीच्या चौथर्‍यावर उभा ठाकेले तेंव्हा ते जगातील आठवे आश्चर्यच ठरेल असे उद्गार विनायक मेटे यांनी काढले. ते म्हणाले की शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी स्मारक अरबी सागरात उभे करण्याची गेल्या पंचवीस वर्षांतील मागणी त्यामुळे पूर्ण होईल. मेटे हे राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अंमलबजावणी व देखभाल समितीचे अध्यक्ष असून त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. स्मारक समितीच्या कफ परेड येथील कार्यलयात खास पत्रकार परिषदेत बोलताना मेटे म्हणाले की 1987 मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने आम्ही या स्मारकाची मागणी प्रथम केली होती. शिवसेना भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले तेंव्हा 14 जुलै 1996 रोजी मराठा महासंघाने घेतलेल्या सत्कार समारंभातच अरबी सागरात स्मारक उभे कऱण्याची अधिकृत घोषणा मनोहर जोशी व गोपिनाथ मुंडे यांनी केली होती. या स्मारकासाठी जी पहिली समिती राज्य सरकारने केली ती सुधीर जोशींच्या नेतृत्वाखाली त्यातही मी काम केले नंतर विलासराव देशमुख आर आर पाटील यांच्या सरकाने जी समिती केली त्यातही मी होतो आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात 2013 मध्ये जयंत पाटील यांची जी समिती होती त्यातही मी काम केले.