शिवसेनेने ठाणे-मुंबई जिंकली, तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका!

0

मुंबई : महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत असल्या तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फक्त मुंबई-ठाणे-पुणे व नाशिकलाच वेळ दिला आहे. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर प्रचारसभांची धावपळ केली आहे. याचे कारण सेनेने आता सरकारमधून बाहेर पडायचे मन बनवले असून, त्यासाठी आपल्या मुंबई-ठाणे या बालेकिल्ल्यात सेनेला पक्के यश हवे आहे. या दोन महापालिका स्वबळावर जिंकल्या तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडायला सज्ज असल्याचे मानले जात आहे. कारण आता युतीपासून सेनेची कुठलीही अपेक्षा राहिलेली नसून, काही मिळवण्यापेक्षा भाजपला सत्तेत अस्थिर करण्याचा सेनेचा मनसुबा पक्का झाला आहे.

भाजपची टांगती तलवार संपविण्याकडे कल

शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडायचे ठरवले तर भाजपला बहुमताची जुळवणी करणे अशक्य आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसही आता पाठिंब्याला येण्याची शक्यता संपलेली आहे. शरद पवार यांनी तर आता मध्यावधी व्हायला हरकत नाही, असा सिग्नलही दिलेला आहे. त्यामुळेच सत्तेत भागिदारी करण्यापेक्षा राज्यातून भाजपची सत्ता घालवण्याकडे सेनेचा कल असेल. पालिकेची सत्ता हिसकावण्यासाठी फडणवीस सरकारने जितके डाव खेळले, तितके पंधरा वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनेही खेळलेले नव्हते. म्हणूनच मुंबई, ठाणे जिंकल्यावर डोक्यावरची भाजप सरकारची टांगली तलवार संपवण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मेमध्ये भाजपचे सरकार नसेल?

मुंबई-ठाणे जिंकल्यावर युती सरकार म्हणून समान सत्तावाटप व्हावे किंवा युती मोडावी; अशी पक्षप्रमुखांची भूमिका आहे. अर्थात शिवसेनेला अधिक मंत्रिपदांपेक्षाही राज्यातील सत्ता भाजपच्या हातून घालवण्यात जास्त रस असल्याचे कळते. मात्र तितके धाडसी पाऊल उचलण्यापूर्वी मुंबई व ठाण्याच्या पालिका हाती आल्या पाहिजेत असे गणित आहे. त्यासाठीच राज्यभरच्या जिल्हा परिषदा व तालुका पंचायतीकडे उद्धव ठाकरे यांनी साफ पाठ फिरवली आहे. येत्या मे महिन्यात राज्यात भाजपचे सरकार नसेल असेही एका शिवसेना खासदाराने बोलून दाखवले.