शिवसेना पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने यावलमधील युवकाला लाभली दृष्टी

0

यावल- हालाखीची परीस्थिती असलेल्या परसाडे येथील युवकाला शिवसेना पदाधिकार्‍यांनी मदतीचा हात दिल्याने विविध शासकीय योजनांच्या मदतीने या युुवकावर उपचार करण्यात आल्याने त्याला दृष्टी लाभली आहे. तालुक्यातील परसाडे येथील भूषण नमायते या 17 वर्षीय युवकाला लहानपणी डोळ्यांचा आजार झाला होता. त्यामुळे त्याचा एक डोळा निकामी झाला होता. कालांतराने त्याच्या दुसर्‍या डोळ्याची दृष्टीदेखील गेली होती. नमायते कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने त्याच्या उपचार करणे शक्य झाले नाही. शिवसेनेचे आदिवासी सेलचे तालुका प्रमुख हुसेन तडवी यांना ही बाब समजताच त्यांनी युवकाच्या कुंटबाला धीर दिला. तसेच या युवकाच्या उपचारासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. परेश तायडे, छोटू जागीरदार, शिवसेना आदिवासी सेलचे तालुका उपप्रमुख परमान तडवी, अरमान तडवी, वसीम तडवी, साहील तडवी, मेहरबान तडवी यांनी पुढाकार घेऊन युवकाच्या उपचारासाठी पैसे जमवले. युवकांनी भूषणला डॉक्टरांकडे नेऊन उपचार केले. तसेच दृष्टीदोश दूर करण्यासाठी विविध शासकिय योजनांचा लाभ मिळवून दिला. शस्त्रक्रियेसाठी प्रवास खर्च व राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.काही दिवसांपुर्वी भूषणच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे त्याचा दृष्टीदोष नाहीसा झाला. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने त्याची दृष्टी परतली. शिवसेना पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे भूषणला गमावलेली दृष्टी पुन्हा परत मिळाली.