शिवरायांशी मोदींची तुलना: महाराष्ट्रातील भाजपने भूमिका स्पष्ट करावी: संजय राऊत

0

मुंबई: दिल्ली भाजपाच्या कार्यालयात एका पदाधिकाऱ्याने ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन केले. हा प्रकार आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणी भाजपाने माफी मागावी आणि पुस्तक तातडीने रद्द करावे अशी मागणी होऊ लागली आहे. वादग्रस्त पुस्तकावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला धारेवर धरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणे राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सर्व मुद्द्यांवर लगेच भूमिका मांडणारे भाजपा नेते शिवराय आणि मोदींच्या तुलनेवर संध्याकाळपर्यंत स्वत:ची भूमिका मांडतील, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राज्याचे दैवत आहे. त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. मात्र भाजपाच्या कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात शिवरायांची तुलना मोदींशी करण्यात आलेली आहे. राज्यातल्या भाजपा नेत्यांना हे मान्य आहे का? असल्यास त्यांनी तसे त्यांनी स्पष्ट सांगावे असे राऊत म्हणाले.

‘शिवरायांचे सगळे वंशज सध्या भाजपात आहेत. त्यांचा आम्ही सन्मानच करतो. सातारा आणि कोल्हापूरच्या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही सर्वसामान्य असूनही शिवरायांच्या मान-सन्मानासाठी भूमिका घेत आहोत. तसंच आव्हान आम्ही शिवरायांच्या वंशजांना केलं तर त्यात चिडायचं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छत्रपतींच्या वंशजांबद्दल मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशीदेखील बोललो आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

Copy