शिवजयंतीसाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला

0

पेठ । छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून हजारो दुर्ग पर्यटक, स्वयंसेस्वी संस्था व नागरिकांनी दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर पहाटेपासून मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र अचानकपणे मधमाशांनी हल्ला केल्याने सर्वत्र एकच धावपळ व पळापळ झाली. शिवजयंतीचे औचित्य साधून नाशिक शहरातील नामवंत डॉक्टर्स, सायकलिंग ग्रूप, ग्लोबल ग्रूप, सोशल नेटवर्किंग फोरम, वैद्यकिय महाविद्यालय विद्यार्थी मंच, नाशिक मेडिकोज यांचेसह शहरातील नागरिकांनी रामशेज किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी सात वाजेपासून पर्यटकांची गडाकडे आगेकूच सुरू झाली. यामध्ये पुरुष, स्त्रियासह लहान बालकांचा व विद्यार्थाचा मोठया प्रमाणावर सहभाग होता.

शिवराय पुतळ्यांच्या पूजन प्रसंगी  झाली घटना

किल्लावरील शिवध्वज स्तंभाजवळ शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाची तयारी सुरू असतांना अचानक कडेकपारी करून मधमाशांचा ओघ सुरु झाला. प्रारंभी विरळ असलेल्या माशा वाढत गेल्या. गडावरील पर्यटकांच्या अंगाला माशा झोंबू लागल्याने एकच पळापळ सुरू झाली. जो तो आपला जीव वाचवत गडावरून पायथ्याकडे पळू लागले. मात्र माशा काही पाठ सोडत नव्हत्या. दिसेल तेथे आसरा घेत माशापासून बचाव करत अवघ्या 15 मिनिटात संपूर्ण गड खाली झाला. अनेकांचे साहित्य, मोबाईल, बॅगा या गडबडीत पडून गेल्या. तर उतरत असतांना पाय घसरून पडल्याने काहींना किरकोळ जखमाही झाल्या. उपस्थित डॉक्टरांनी तात्काळ आपआपल्या हॉस्पीटला फोन करून रुग्णवाहिका मागवल्या तर तिथ उपस्थित आलेल्यापैकी रूग्णवाहेकेशी संपर्क साधुन बोलाविण्यात आले. माशांनी चावा घेतलेल्या रुग्णांवर तिथेच उपचार करण्यात आले. तर काहींना प्राथमिक उपचार करून रुग्णालयात हलवण्यात आले.