शिरूर रस्त्यासाठी बेमुदत उपोषण

0

रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे; दोषी अधिकार्‍यांवर कारवाई मागणी

शिक्रापूर : पुणे-नगर रस्ता वाघोली ते शिरूर रस्त्यासाठी दोनशे बावीस कोटी चोवीस लाख मंजूर होऊनही काम सुरू होत नसल्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे आणि वाहनचालकांची वाहनकोंडीतून मुक्तता करावी व दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी क्रांतिवीर प्रतिष्ठान व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता.शिरूर) येथे क्रांतिवीर प्रतिष्ठान, ग्राहक पंचायत, पतंजली योग समिती, शेतकरी संघटना यांच्या वतीने सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. याप्रसंगी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे, ग्राहक पंचायतचे प्रांत संघटक धनंजय गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, पतंजलीचे तालुकाध्यक्ष अंकुश घारे, शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे, कोरेगाव भिमाचे माजी सरपंच अनिल कोल्हे, डॉ. विष्णुपंत सूर्यवंशी, निमगाव म्हाळुंगीचे उपसरपंच कानिफ गव्हाणे, विशाल वर्पे, उद्योजक हरीशशेठ येवले, अशोक भुजबळ, दत्ता गिलबिले, उत्तम गायकवाड यांसह व ग्रामस्थ उपस्थित होते.

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येसाठी प्रशासन जबाबदार असून, राज्य शासनाने यापूर्वी चारशे पासष्ट कोटी या रस्त्यासाठी मंजूर केले परंतु त्यावेळी काही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यांनतर पुन्हा राज्य सरकारने दोनशे बावीस कोटी चोवीस लाख रुपये मंजूर केले. परंतु तरीदेखील या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. या निधीतून फक्त रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्याचे योजिले आहे.

भाजपचाही उपोषणास पाठिंबा

उपोषणाचा दुसरा दिवशीही अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी या उपोषणास पाठिंबा दर्शविला. यामध्ये शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भगवान शेळके यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

Copy