शिरूडमधील एटीएम चोरीचा गुन्हा उघड : एका आरोपीला अटक

0

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तिघा पसार आरोपींचा कसून शोध सुरू

धुळे : तालुक्यातील शिरूड गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएमच चोरट्यांनी लांबवल्याची घटना शनिवार, 29 फेबु्रवारी 2020 रोजी पहाटे घडली होती. या गुन्ह्याची उकल करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अन्य चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

नूतन पोलिस अधीक्षकांना चोरट्यांनी दिली होती सलामी
जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना रूजू होवून 48 तास होत नाही तोच चोरट्यांनी शनिवार, 29 रोजी पहाटे 14 लाख सात हजार 500 रुपयांची रोकड असलेले एटीएम लांबवले होते. शनिवारी रात्री दोन वाजून 19 मिनिटांच्या सुमारास चेहर्‍यावर शाल झाकलेल्या एका चोरट्याने एटीएमच्या दालनात प्रवेश करीत वायररोप एटीएमला अडकवला व पीकअपच्या सहाय्याने एटीएम बाहेर काढल्यानंतर अन्य तिघा चोरट्यांनी एटीएम पीकअप वाहनात टाकून घटनास्थळावरून पळ काढला होता. विशेष म्हणजे एटीएम लांबवण्यासाठी चोरट्यांनी धुळे शहरातील अग्रवाल नगर भागातून पीकअप वाहन लांबवल्याचे निष्पन्न झाले होते.

गुन्हे शाखेने उघडकीस आणला गुन्हा
धुळे गुन्हे शाखेला मालेगाव रोड परीसरातील चॅम्पियनसिंग मिलसिंग भादा याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यास चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्याने अन्य चार साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींनी मोहाडी परीसरातून दोन दुचाकींची सुरूवातीला चोरी केली व अग्रवाल नगरातून नंतर पीकअप लांबवत एटीएम मशीन लांबवले होते शिवाय हे एटीएम शहरातील दंडेवाले बाबा नगरात तोडून त्याची विल्हेवाट नवकार नगरातील, सावळदे रोड, मोहाडी येथील विहिरीत लावली होती तसेच चोरीचे वाहन डेडरगाव तलावाजवळ सोडल्यासह चोरीतील दुचाकी मोहाडी गावात सोडल्याची कबुली दिली. यानंतर पथकाने एटीएम तोडण्यासाठी लागणारे साहित्य छीनी, हातोडा, इलेक्ट्रॉनिक कटर तसेच 50 हजार रुपये किंमतीचे एटीएमचे पाच तुकडे व आरोपीच्या हिश्याला आलेली एक लाखांची रोकड जप्त केली.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळ्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक निरीक्षक उमेश पाटील, उपनिरीक्षक हनुमान उगले, अनिल पाटील, नथ्थू भामरे, रफिक पठाण, संदीप थोरात, सुनील विंचूरकर, संजय पाटील, महेंद्र कापूरे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, कुणाल पाटील, अशोक पाटील, उमेश पवार, राहुल सानप, रवीकिरण राठोड, विशाल पाटील, मयूर पाटील, श्रीशैल जाधव, योगेश जगताप, तुषार पारधी, मनोज बागुल, सागर शिर्के, चेतन कंखरे, मनोज पाटील, नितीन मोहने, वसंत पाटील, मायूस सोनवणे, विजय सोनवणे, महेश मराठे, मनोज ब्राह्मणे, किशोर पाटील, गुलाब पाटील, दीपक पाटील, विलास पाटील, केतन पाटील आदींनी ही कारवाई केली.