शिरपूर-शहादा मार्गावर अपघात

0

धुळे। शहरात दुचाकी व डंपर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा पाय तुटल्याची घटना घडली. विठ्ठल लॉन्ससमोर दुचाकी व डंपर यांच्यात समोरासमोर धडक झाली. दुचाकीस्वारास हा जवखेडा येथील रहिवाशी असून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आहे. रविवार 7 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास संदीप सुरेश पाटील (वय 36) व रविंद्र भिमराव पाटील (वय 40) दोघे राहणार जवखेडा हे गाडी क्र. एमएच 18-एडी 7820 ने शिरपूरहून जवखेडा येथे जाण्यासाठी गाडीने निघाले होते. यातच शिरपूर-शहादा मार्गावरील शहरापासून 2 ते 3 किमी अंतरावरील विठ्ठल लॉन्ससमोर समोरून येणारा डंपर गाडी क्र. एमएच 18-एम4015 ने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली.

बघ्यांची फोटोसाठी गर्दी
या अपघातात संदीप पाटील यांचा उजवा पाय गुडघ्यापासून रस्त्यावर तुटून पडला तर रविंद्र पाटील हे रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्यामुळे ते किरकोळ जखमी झालेत. घटना घडताच डंपरचालक अपघातस्थळी गाडी सोडून पसार झाला. यावेळी अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दोघ दुचाकीस्वार जखमी अवस्थेत रस्त्यांवर पडलेले असतांना कोणीही कोणत्याही प्रकारची मदत करतांना दिसत नव्हते. व्हॉटस्अप, सेल्फिच्या जमान्यात लोकांना दोन्ही जखमींना मदत करणे गरजेचे वाटले नाही. बघ्यांनी आपले मोबाईल काढून जखमींचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करणे पसंत केले. अपघात झाल्यावर जखमींना मदत करणे अपेक्षित असतांना बघ्यांची भूमिका घेणार्‍यांमुळे अपघातातील जखमी जीवाला मुकण्याची शक्यता असते. तरी अपघातातील जखमींना मदत करणे आवश्यक आहे.

शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल
अपघातग्रस्तांचे फोटो मोबाईलमध्ये काढण्यासाठी अपघात पहाणार्‍यांमध्ये चढाओढ लागली होती. भर उन्हात जखमी पडलेेले असतांना बघ्यांनी जखमींना मदतीऐवजी फोटो काढण्यात धन्यता मानली. थोड्या वेळाने त्या दोघांना अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संदीप पाटील यांचा पाय तुटल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. याबाबत रूग्णालयाचा वॉर्डबॉय अशोक बिरारी यांनी दिलेल्या खबरीवरून शिरपूर पोलिस ठाण्यात मोटर अपघात दाखल करण्यात आला आहे.