शिरपुरात बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त

0

शिरपूर । शहराच्या मधोमध असलेल्या शिरपूर-वरवाडे गावातील एका तीन मजली इमारतीच्या तळमजल्यात सुरू असलेला बनावट दारू निर्मीतीचा कारखाना पोलीसांनी उधळून लावला असून तब्बल साडे चार लाखाचा बनावट मद्य साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध कंपनीचा देशी-विदेशी मद्यासाठा
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरपूर पोलीसांनी संयुक्तरित्या दि.27 रोजी सायंकाळी शिरपूर-वरवाडे येथील महात्मा फुले पुतळ्याच्या पुढे असलेल्या तेजस्विनी निवास या तीन मजली इमारतीच्या तळघरात छापा टाकला असता या ठिकाणी नारायण अशोक पगारे (माळी)रा. वरवाडे हा बनावट दारू बनविण्याचा कारखाना खालवित असल्याचे आढळून आले. मानवी शरीरास घातक द्रव्य असलेल्या स्पिरीटच्या सहाय्याने देशी-विदेशी दारू तयार करण्याचे काम याठिकाणी केले जात होते. या कारवाईत पोलीसांनी 4 लाख 51 हजार 881 रूपयांचा विविध कंपनीचा देशी-विदेशी मद्यासाठा तसेच बाटल्यांना बुच बसविण्याचे यंत्र व साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोकॉ.मनोज भाऊसाहेब पाटील यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.