शिक्षिकेने मारल्याने मुलीनी केली आत्महत्या

0

मुंबई : शिक्षिकेने मारलं म्हणून वडाळायेथील एका १३ वर्षांच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. पोलिसांनी शिक्षिकेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन येथील के.डी. गायकवाड महापालिका शाळेत ही मुलगी सहाव्या इयत्तेत शिकत होती. ती गुरुवार-शुक्रवारी शाळेत गेली नाही. शनिवारी गेली. तिचा होमवर्क अपूर्ण होता. पालकांनी पोलिसांना सांगितले की, मुलगी शनिवारी घरी आली तेव्हा ती रडत होती. तिने त्यांना सांगितले की, होमवर्क पूर्ण झाला नव्हता म्हणून शिक्षिकेने तिच्या कानशिलात लगावली. घरी आल्यानंतर काही वेळानंतर तिने घरच्या सिलिंगला गळफास लावून आत्महत्या केली. मुलीने आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. त्या दिवशी वर्गात नेमकं काय घडलं होतं, त्याचा पोलीस तपास करत आहेत. शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.