शिक्षण सभापतीपद भोळेंकडे तर कृषी दिलीप पाटील?

0

जळगाव। जिल्हा परिषदेची सदस्य, अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सभापतीपदाची निवडणुक पार पडली आहे. 21 मार्च रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाली. त्यानंतर 1 एप्रिल रोजी जिल्हा परिषद विविध विषय समिती सभापतींची निवड झाली. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय असलेले माजी अभियंता जे.के.चव्हाण यांच्या पत्नी रजनी चव्हाण यांची तर समाजकल्याण समिती सभापतीपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भिला गोटू सोनवणे यांचे बंधु प्रभाकर सोनवणे यांची वर्णी लागली. चाळीसगाव तालुक्यातील पोपट भोळे व चोपडा तालुक्यातील कॉग्रेसचे दिलीप पाटील यांना देखील अनुक्रमे विषय समिती 1 व 2 चे सभापतीपद मिळाले आहे. मात्र त्यांचे अद्याप खातेवाटप झालेले नाही. दरम्यान नवनियुक्त सदस्यांच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत खातेवाटप होणार असले तरीही शिक्षण व आरोग्य समिती सभापतीपद पोपट भोळे यांना तर कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपद दिलीप पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. भोळे व पाटील यांना मिळणारे खाते निश्‍चित झाले असून केवळ सर्वसाधारण समितीच्या मान्यतेची औपचारिकता बाकी आहे.

समिती सदस्यासाठी चढाओढ
जिल्हा परिषदेच्या चार समितीपैकी भाजपाच्या तीन तर कॉग्रेसच्या एका सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापतीपदाची निवड झाली असली तरी समिती सदस्यांची निवड अद्याप झालेली नाही. सर्वसाधारण सभेनंतर जिल्हा परिषद पदाधिकारी समिती सदस्यांची निवड करणार आहे. जिल्हा परिषदेत एकुण दहा विषयी समिती असून त्यात सर्वच पक्षाच्या सदस्यांना सामावून घेण्यात येते. महत्त्वाच्या विषय समितीत सदस्यपद मिळविण्यासाठी सदस्यांची चढाओढ सुरु आहे. समिती सदस्यपद मिळविण्याकरीता स्पर्धा वाढल्याने पदाधिकार्‍यासमोर देखील पेच पडला आहे.

मर्जीतील सदस्यांचा प्राधान्य
जिल्हा परिषदेच्या सर्व विषय समित्या महत्त्वाच्या असल्या तरी स्थायी व जलव्यवस्थापन समिती अतिमहत्त्वाच्या मानल्या जाताता. स्थायी व जलव्यवस्थापन समितीचे पदसिध्द सभापती हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. बांधकाम समिती सभापतीपद हे उपाध्यक्षाकडे असते. स्थायी समितीकडूनच सर्व विषय जात असल्याने स्थायी समिती सदस्यपद मिळविण्याकरीता सदस्य आपआपल्या परीने प्रयत्न करीत असतांना दिसत आहे. या समितीच्या सदस्यपदी भाजपाला सत्तास्थापनेसाठी मदत करणार्‍यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.