शिक्षण पद्धतीचा नव्याने विचार करण्याची गरज – प्रा. कुलकर्णी

0

पुणे : प्रत्येक पिढीचे प्रश्‍न असतात. शिक्षणक्षेत्रात काही वर्षांपूर्वी शिक्षक केंद्रस्थानी होते. कालांतराने शिक्षण केंद्रस्थानी झाले. आज त्याजागी असलेल्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाची जुनी फुटपट्टी न लावता नव्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत प्रा. अरविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी आयोजित अत्रे पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गुरूवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार डॉ. राजाराम दांडेकर व रेणू दांडेकर यांना तर इंदिरा अत्रे पुरस्कार प्रा. अरविंद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी संजीव महाजन, सुधन्वा बोडस उपस्थित होते.

कल्पनांना आकार देण्याचा प्रयत्न

स्वत:साठी जगताना समाजासाठी काही करावे, असे वाटत असल्याने ग्रामीण भागात शाळा सुरू केली. शिक्षणाच्या विविध वाटा धुंडाळताना मुलांच्या मनाची मशागत केली. त्यांच्या कल्पनांना आकार देण्याचा प्रयत्न केला. अंधारात चमकणार्‍या काजव्यांना आपण किती प्रकाशमान आहोत हे माहीत नसते. प्रत्येक शाळा अशा काजव्यांनी भरलेली असते. त्यांना ही जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे डॉ. राजाराम दांडेकर यांनी यावेळी सांगितले. समाजातील वंचित घटकांना स्वावलंबी बनविणार्‍या व्यक्तींना सन्मानीत करताना आम्हाला नवी उर्जा मिळते, असे प्रतिपादन डॉ. प्रभा अत्रे यांनी यावेळी केले. डॉ. सागर देशपांडे, प्रा. हेमंत गोखले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

Copy