शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

जळगाव । शहरातील महाबळ कॉलनी परिसरातील समाज कल्याण कार्यालयातील आवारात गुरूवारी सकाळी एका शिक्षकाने नौकरीवर हजर करून घेण्यात यावे या कारणावरून अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनास्थळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल होताच त्यांनी शिक्षकाला ताब्यात घेतले. यानंतर शिक्षकाविरूध्द आत्महत्तेचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी चाळीसगांव तालुक्यातील मुनखेडे येथील रहिवासी मनोहर राजधर पाटील (वय-40) हे शिक्षक असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांना आश्रम शाळा करगांव येथे नौकरीवर हजर करून घेत नसल्याने त्यांनी गुरूवारी शहरातील महाबळ कॉलनी परिसरातील समाज कल्याण कार्यालय गाठले. संतप्त झालेले पाटील यांनी नौकरीवर हजर करून घेत नसल्याने चक्क आत्मदहनाचा पवित्रा घेत अंगावर रॉकेल ओतून घेतले. आत प्रवेश मिळत नसल्याने मनोहर पाटील यांनी कार्यालयाच्या आवारातील कंपाऊंडवरून उडी मारून आत प्रवेश केला. यानंतर करगांव आश्रमशाळा येथे हजर करून घ्या अशी मागणी तेथील अधिकार्‍यांकडे केली. शिक्षक आत्मदहन करत असल्याची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी आले.
अंगावर रॉकेट ओतले असल्याने मनोहर पाटील यांनी माचीसने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी त्यांना पकडून ठेवले. त्यांना पोलीस ठाण्यात नेले व संपूर्ण प्रकाराबाबत पोलीसांनी चौकशी केली. परंतू आत्महत्तेचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोहेकॉ. वसंत बेलदार यांच्या फिर्यादीवरून शिक्षक मनोहर पाटील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीचा तपास फेगडे करीत आहेत.