शिक्षकांच्या शंभर टक्के उपस्थितीची सक्ती करणार्‍यांवर व्हावी कारवाई

शिक्षण तज्ज्ञ तथा भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारीणी सदस्य प्र.ह.दलाल यांची मागणी

भुसावळ : महाराष्ट्र राज्य शिक्षण संचलनालय, पुणे यांनी 14 जून 2021 रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शाळेतील उपस्थितीबाबत आदेश पारीत करण्यात आले आहेत. त्याचा संदर्भ देत जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. दहावी-बारावी वर्गाच्या वर्गांचे मूल्यमापनाचे काम सुरू असल्याने त्या वर्गांच्या शिक्षकांनी दररोज शंभर टक्के उपस्थित द्यावी, पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांपैकी केवळ 50 टक्के शिक्षकांनी उपस्थिती द्यावी तसेच मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शंभर टक्के उपस्थित असावे, असे आदेशात नमूद आहे मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून जिल्ह्यातील बहुसंख्य माध्यमिक शाळा पटावरील सर्वच शिक्षकांना शंभर टक्के उपस्थित राहण्याची सक्ती करीत आहेत. परीणामी माध्यमिक शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासन आदेशाला केराची टोपली दाखवून मनमानी करणार्‍या शाळांच्या मुख्याध्यापकांसह व्यवस्थापनाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ शिक्षक नेते, भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारीणी सदस्य तथा नाशिक विभाग सहसंयोजक प्र.ह.दलाल यांनी केली आहे.