शिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी कोविड चाचणीच्या निर्देशात बदल

0

जळगाव: राज्यातील इयत्ता नववी ते 12 वी पर्यंतच्या शाळा उघडण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची कोविडची चाचणी करून घेतली जाणार आहे. त्यासाठीच्या निर्देशात बदल केला गेला आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुरुवातीला थर्मल स्कॅनिंग केले जाईल. यामध्ये शरीराचे तापमान आणि ऑक्सीजनची पातळी पाहिली जाईल. त्यामध्ये कोविडची लक्षणे दिसणार्‍यांची आरटीपीसीआर चाचणी आणि ज्यांच्यामध्ये लक्षणे नाहीत अशांची अँटीजन चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, अँटीजन चाचणीच्या निष्कर्षाबाबत शंका असल्यास आरटीपीसीआर चाचणी करून घेता येणार आहे.

एखादा बाधित आढळल्यास विद्यार्थ्यांसह सर्वांचीच होणार चाचणी

सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे दररोज शरीराचे तापमान व ऑक्सीजन पातळी तपासावी लागणार आहे. यावेळी जर कोणात लक्षणे आढळून आल्यास त्यांना जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील तपासणीसाठी पाठवावे लागेल. या तपासणीत संबंधित व्यक्ती बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या शाळेतील त्यांच्या संपर्कातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचीही तपासणी करून घ्यावी लागणार आहे.

शाळेत कार्यक्रम आयोजनावर निर्बंध
गर्दी होणारे कार्यक्रम अर्थात परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा स्पर्धा यांच्या आयोजनास मनाई करण्यात आली आहे. तसेच शिक्षक-पालक बैठक ऑनलाईन घेण्यास सांगण्यात आले आहे.

पालकांच्या संमतीने घरी राहून अभ्यास करता येणार
विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी या विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.

पालकांनी स्वतःच्या वाहनाने मुलांना शाळेत सोडण्यास प्राधान्य द्यावे
कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे. शाळा वाहतुकीच्या वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा (विद्यार्थी वाहनातून येतांना व उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

किमान सहा फूट अंतराचे बंधन
वाहनचालक व वाहक यांनी स्वतः तसेच विद्यार्थी शारीरिक अंतराचे पालन करतील याची दक्षता घ्यावी. किमान 6 फूट अंतर राखण्यात यावे, बस/कार यांच्या खिडक्यांना पडदे नसावेत. वातानुकूलित बसेस मध्ये 24 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान राखावे.शक्य असल्यास वाहनात हॅन्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.

शाळेतील नियमित उपस्थिती बंधनकारक नाही
विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात यावी. शाळेतील कर्मचार्‍यांना त्यांना नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त आणीबाणीच्या प्रसंगी इतर कर्मचार्‍यांची कामे करण्यासाठी प्रशिक्षित करावे, असे स्पष्ट निर्देशासन आदेशात देण्यात आले आहेत.

Copy