Private Advt

शिंगावे येथील सरपंचासह परिवारातील सहा जण अँस्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल 

शिरपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिंगावे येथील वीटभट्टी चा व्यवसाय करणाऱ्याला सरपंच व त्यांच्या परिवाराने जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी सरपंचासह सहा जणांवर अँस्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंगावे येथील मनोहर रमेश थोरात हे १३ वर्षापासून शनीमंदीरजवळ अरुणावती नदी पात्रात विटभट्टीचा व्यवसाय करतात. त्यांनी यावर्षीही शिंगावे गावातील अरुणावती नदी पात्रात विटभट्टीचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आवश्यक असतो. म्हणून ते १७ नोव्हेंबर रोजी सकाळी शिंगावे ग्रामपंचायत: कार्यालयात जावून ग्रामसेवक जे.पी.पावरा यंच्याकडून दाखल घेतला. दाखल्यावर सरपंचांचा शिक्का मारून सरपंचांची सही घेणेसाठी ते मंजुळाबाई पाटील यांचे घरी गेले मात्र त्या घरी नव्हत्या.

थोरात परत १८ नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा सरपंच मंजुळाबाई पाटील यांचे घरी गेले. त्या त्यांचे घरासमोर हिंगोणी-बाळदे रस्त्यालगत असलेल्या म्हशीचे गोठ्याजवळ खुर्ची टाकून बसलेल्या दिसल्या. त्यांचेजवळ जावून त्यांना दाखला दाखवून त्यावर सही मागितली. मात्र त्यांनी सदर दाखला मुलांना दाखवेल व तो वाचल्या शिवाय तुला सही देणार नाही असे सांगितले. त्याचवेळेस त्यांचा मुलगा विकास गुलाबराव पाटील हा तेथे आला त्यास सरपंच मंजुळाबाई यांनी दाखला दाखविला.

विकास गुलाबराव पाटील याने दाखला वाचला.दाखला वाचल्यानंतर त्याने थोरात यांना जातीवाचक शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. त्याचवेळेस तेथे गुलाबराव वामन पाटील, राजेंद्र गुलाबराव पाटील, सनी प्रदिप पाटील, दिग्वीजय राजेंद्र पाटील असे हातात काठ्या घेवून आले. त्यांनी शिवीगाळ करीत सर्वांनी मिळून थोरात यांना काठ्यांनी व हाताबुक्यांनी पाठिवर, पोटावर मारहाण केली. तसेच राजेंद्र गुलाबराव पाटील याने त्याचे हातातील सळईने मानेवर मारले व सनी प्रदिप पाटील याने त्याचे हातातील चाकुने डावे हाताचे दंडावर मारून दुखापत केली.

थोरात आरडा-ओरड करू लागले.तेव्हा त्यांचा आवाज ऐकून त्यांचे आई-वडील तेथे धावून आले.यावेळी विकास गुलाबराव पाटील याने थोरात यांच्या वडीलांच्या उजव्या हातावर व कमरेवर काठीने मारहाण केली. तसेच सरपंच मंजुळाबाई यांनी थोरात यांच्या आईस काठीने पाठिवर व पोटावर मारहाण करून शिवीगाळ केली.

भांडणाचा आवाज ऐकुन तेथे आजूबाजूस राहणारे गावातील भिमराव देवराव निकम, गोविंदा भिमराव थोरात, मिलींद आनंदा निकम व चंद्रकांत लोटन पाटील असे धावून आले त्यांनी भांडणाची सोडवा-सोडव केली. सदर भांडणात

दुखापत झाल्याने आम्हास भिमराव देवराम निकम व गोविंदा थोरात अशांनी त्यांच्या दुचाकीने उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर औषधोपचार होऊन ते सध्या घरी आहेत.

मनोहर रमेश थोरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुलाबराव वामन पाटील, विकास गुलाबराव पाटील, राजेंद्र गुलाबराव पाटील, सनी प्रदीप पाटील, दिग्वीजय राजेंद्र पाटील, मंजुळाबाई गुलाबराव पाटील सर्व राहणार शिंगावे

यांच्याविरोधात शिरपूर शहर पोलिसांत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(आर),(एस)सह भादवि कलम १४३, १४७ ,१४८,१४९,३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे करीत आहेत.