शासन शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करत आहे

0

 

अमळनेर : बहुजन समाजाला शिक्षण मिळाले पाहिजे याची संकल्पना महात्मा फुलेंनी मांडली. शिक्षण हे सक्तीचे असले पाहिजे, असे मत हंटर कमिशन समोर मांडले. आज महाराष्ट्रात एक लाख शाळा आहेत. शासन दररोज नवीन अध्यादेश काढत आहे. शिक्षणाचा बजेट दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. शिक्षकांना अतिरिक्त करण्याचा उद्योग शासनाचा सुरु आहे. शिक्षकांना अतिरिक्त कामे दिल्याने अध्यापनाकडे दुर्लक्ष झाले आहे. शिक्षण तंज्ञाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. शासन शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करत आहे, असे ओबीसी शिक्षण असोसिएशनच्यावतीने महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त नाशिक विभागीय गुणगौरव पुरस्कार वितरण प्रसंगी धुळे येथे गरुड वाचनालयात पदवीधर आमदार सुधीर तांबे बोलत होते.

व्यासपीठावर ओबीसी शिक्षण असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव पाटील, काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.ललिता पाटील, अ‍ॅड.संभाजी पगारे, बापू खलाणे, डॉ.सुशिल महाजन, प्रा.एस.के.चौधरी, देवेंद्र पाटील, आर.डी.पाटील, गं.का.सोनवणे, प्रा.तिर्थदास अहिरे होते. कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ, सावित्रीबाई व महात्मा फुलेंच्या प्रतिमापूजनाने झाली.

काँग्रेसच्या सरचिटणीस अ‍ॅड.ललिता पाटील यांचे मार्गदर्शन
ओबीसी असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी महात्मा फुले स्मृतिदिन निमित्ताने शिक्षकांचा गुणगौरव केला जातो. गेल्या दहा वर्षापासून सामाजिक बांधलकीच्या जाणिवेतून अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. त्यासाठी अभिनंदन करते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपल्या शाळेतील मुले शिकली पाहिजे, यासाठी प्रयत्नशिल असले पाहिजे. आज शिक्षकाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यासाठी आपल्याला बदलणे गरजेचे आहे. आज वाचन संस्कृती लोप पावली आहे. बर्‍याच मुलांना व्यावहारीक ज्ञान नाही, त्यासाठी शिक्षकांना सजग राहावे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस अ‍ॅड.ललिता पाटील या मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. अ‍ॅड.संभाजी पगारे यांनी मातेच्या हृदयाप्रमाणे शिक्षक राहिला पाहिजे तर अध्यक्षीय भाषणातून विलासराव पाटील म्हणाले की, शिक्षकाला चांगल्या कामालाही वेळ नाही. कोणतेही काम करत असतांना स्वत:ला झोकून दिले पाहिजे. महात्मा फुलेच्या स्मृतिदिनानिमित्त तुमचा गुणगौरव केल्याने पुरस्कार प्राप्त शिक्षकाची जबाबदारी वाढली आहे. आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविले पाहिजे, असे सांगितले.

71 शिक्षकांचा होत आहे सन्मान
कार्यक्रमात जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक विभागातून प्राथमिकते वरिष्ठ महाविद्यालयातील 71 शिक्षकांना सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतीश वैष्णव यांनी केले तर सुत्रसंचलन वसुंधरा लांडगे यांनी केले. कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव अर्बन बँक, सानेगुरुजी पतपेढी, खान्देश शिक्षण मंडळात विशेष मतांनी निवडून आलेल्या वसुंधरा दशरत लांडगे, यांचा सत्कार आ.सुधीर तांबे यांनी केला. आभार ईश्‍वर महाजन यांनी मानले, तर यशस्वीतेसाठी काशिनाथ माळी, ईश्‍वर माळी, सोपान भवरे, संजय खलाणे, प्रा.जितेंद्र पगारे, अनिल सोनवणे, वासुदेव माळी, दशरथ लांडगे, राजेंद्र माळी यांनी प्रयत्न केले.